दुबई : आफ्रिकन वंशाचा अमेरिकेचा नागरिक जॉर्ज फ्लॉयड याचा पोलीस अत्याचारामुळे मृत्यू झाल्याने जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध आवाज बुलंद होऊ लागला आहे. यासंदर्भात आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेनेदेखील प्रतिक्रिया दिली. विविधतेशिवाय क्रिकेट अतिस्त्वहीन असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
मागच्या आठवड्यात एका श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने फ्लॉयडचे हात बांधून त्याचा गळा गुडघ्याने दाबला होता. या घटनेचे हिंसक पडसाद उमटले. आयसीसीने शुक्रवारी ९० सेकंदांची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. ही क्लिप इंग्लंडच्या २०१९ च्या विश्वविजेतेपदाच्या अखेरच्या क्षणाशी निगडित आहे. त्यात बार्बाडोस येथे जन्मलेला जोफ्रा आर्चर न्यूझीलंडविरुद्ध अखेरचे षटक टाकताना दिसत आहे.
आपल्या संदेशात आयसीसी म्हणते, ‘विविधतेशिवाय क्रिकेटचे अस्तित्व काहीही नाही. विविधता नसेल तर स्पष्ट चित्र पुढे येत नाही. विश्वचषक जिंकणाºया इंग्लंडचा कर्णधार आयर्लंडचा इयोन मोर्गन होता. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा अष्टपैलू बेन स्टोक्स याचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला, फिरकी गोलंदाज मोईन अली आणि आदिल राशिद हे मूळचे पाकिस्तानी आहेत तर सलामीवीर जेसन रॉय हा आफ्रिकन वंशाचा आहे.’
वेस्ट इंडिजचे खेळाडू ख्रिस गेल आणि डेरेन सॅमी यांच्यासह अनेक खेळाडूंनी वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला आहे. सॅमीने तर आयसीसीला कृष्णवर्णीय खेळाडूंच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केलेहोते. (वृत्तसंस्था)