ठळक मुद्देविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कसोटी आणि वन डे मालिका विजय मिळवले. भारत आणि न्यूझीलंड यांच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.भारतीय संघ येथे पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे.
मेलबर्न : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कसोटी आणि वन डे मालिका विजय मिळवले. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर विराटसेना न्यूझीलंडसाठी रवाना झाली आहे आणि तेथे खेळाडूंचा खरा कस लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे याही दौऱ्यावर कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेली दहा वर्षे कोहलीने क्रिकेट रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यानेही यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करून चाहत्यांना भरभरून दिले. पण, ज्या क्रिकेटने ओळख दिली, त्या क्रिकेटचे कोहलीच्या आयुष्यातील स्थान हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे सामन्यात कोहलीने 39वे शतक झळकावले. त्याचे हे 64वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आणि त्याने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराचा विक्रम मोडला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीत कोहली भारताचा सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, क्रिकेट हे आयुष्यातील एक भाग आहे आणि आयुष्यात कुटुंब हे प्राधान्य असल्याचे मत, कोहलीने व्यक्त केले. तो म्हणाला,'' आठ वर्षांहून अधिक काळ क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे आता कुटुंब हे माझे प्राधान्य आहे. क्रिकेट हा आयुष्यातील एक भाग आहे आणि तो कायम राहील, परंतु कुटुंब हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याला प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्यापेक्षा आयुष्यात दुसरे काहीच महत्त्वाचे नाही.''
'विराट कोहली अॅप'साठी दिलेल्या मुलाखतीत भारतीय कर्णधाराने हे मत व्यक्त केले. तो पुढे म्हणाला,'' जर क्रिकेटला गांभीर्याने घेतले नाही, तर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही. पण मला असे वाटत नाही. आयुष्यात काही घडो तुम्ही अखेरीस कुटुंबियांकडेच येता. त्यामुळे कुटुंबाला प्राधान्य द्यायलाच हवे. क्रिकेटमधील माझा प्रवास एक दिवस संपेल, पण कुटुंबासोबतचा प्रवास अजून पुढे बराच काळ सुरू राहणार आहे. क्रिकेटमध्ये आठ वर्षांहून अधिक काळ घालवला आणि आता कुटुंबाला अधिकाधिक वेळ देण्याचा प्रयत्न असेल.''
भारत आणि न्यूझीलंड यांच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ येथे पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे.
Web Title: Cricket not the most important thing in life, Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.