मुंबई : डावखुरा फिरकी गोलंदाज ओमकार करंदीकरचे ६ बळी आणि सुमित मिश्राचा शतकी तडका हे संतोषकुमार घोष ट्रॉफी या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढतींचे वैशिष्ठ्य ठरले. करंदीकरने ९० धावांत ६ बळी मिळविल्याने शिवाजी पार्क जिमखानासंघाने मुंबई पोलिसांना २४५ धावांत रोखले आणि पहिल्या दिवसा अखेर त्यांनी बिनबाद १९ धावा केल्या आहेत. दुसऱ्या उपांत्य लढतीत एव्हरग्रीन सी.सी. संघाने युनायटेड सी.सी. विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २६१ धावा केल्या आहेत. सुमित मिश्राच्या (१०१) शतकी खेळीमुळे त्यांना ही मजल मारता आली.
मुंबई पोलीस जिमखाना संघाची सुरुवातीला ३ बाद २७ अशी खराब सुरुवात झाली होती पण नंतर आतिफ खान (६८) आणि खुश जैन (५१) यांच्या दमदार फलंदाजीमुळे त्यांना २४५ धावांची मजल मारता आली.
एव्हरग्रीन सी.सी. संघाने पहिल्या दिवशी ८ बाद २६१ धावा केल्या त्यात सुमीत मिश्रा याने तब्बल १८ चौकार ठोकत १०१ धावांची खेळी सजवली. त्याला यश सबनानी (३७) आणि पूजन राऊत (३८) व वैष्णव नखाते (खेळत आहे ३३) यांनी चांगली साथ दिली. युनायटेड क्रिकेट क्लबच्या भरत दोराई राजन (३८/३), ऑफ स्पिनर अक्षय तळेकर (५१/२) आणि अंशुमन सुरेश (८६/२) यांनी गोलंदाजीत चमक दाखवली.
संक्षिप्त धावफलक : मुंबई पोलीस जिमखाना – ५८.२ षटकात सर्वबाद २४५ (युग गाला २८, हिरल पांचाल २९, आतिफ खान ६८, खुश जैन ५१; ओमकार करंदीकर ९० धावांत ६ बळी, अथर्व भगत ३९/२) वि. शिवाजीपार्क जिमखाना – ४ षटकात बिनबाद १९.
एव्हरग्रीन सी.सी. – ७० षटकात ८ बाद २६१ (सुमीत मिश्रा १०१, यश सबनानी ३७, पूजन राऊत ३८, वैष्णव नखातेखेळत आहे ३३; भारत दोराई राजन ३८/३, अक्षय तळेकर ५१/२, अंशुमन सुरेश ८६/२).