पुणे : या सर्व शिबिरांच्या मदतीने देशातील सर्व लहान मुला-मुलींनी फक्त चांगला क्रिकेटपटूच नाही, तर आयुष्यात चांगला माणूस बनावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एक उत्तम व्यक्ती म्हणून जगण्याची माझ्या वडिलांची शिकवण मी पुढे चालविणार आहे. २९ वर्षांच्या माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर अजूनही क्रिकेट माझ्या हृदयात असून, अर्थातच तिथे कायमस्वरूपी राहील, अशी नि:संदिग्ध ग्वाही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुवारी येथे दिली.
तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने पुण्यातील बिशप्स हायस्कूलच्या मैदानावर मार्गदर्शकाच्या भूमिकेत सचिन आणि त्याचा जिवलग मित्र विनोद कांबळी होते. या वेळी सचिन म्हणाला, की मिडलसेक्स काऊंटीचे संचालक मंडळ आणि माझे या विचारावर एकमत झाल्याने या अॅकॅडमीच्या पद्धिकाऱ्यांसह ही कल्पना सत्यात आली. सध्या क्रिकेटच्या पद्धतीत प्रचंड बदल झाला आहे. टी-१० क्रिकेटलाही आता सुरुवात झाली आहे. असे असले तरीही, क्रिकेटचे मूळ तंत्र तेच राहते आणि त्याचेच मार्गदर्शन आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे मत सचिनने या वेळी व्यक्त केले.
चार दिवस चाललेल्या या शिबिरात माजी रणजीपटू मिलिंद गुंजाळ, संतोष जेधे, शंतनू सुगवेकर, प्रदीप सुंदरम व एनसीचे मार्गदर्शक अतुल गायकवाड यांनी खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यांचे धडे दिले. सचिन तेंडुलकर व विनोद कांबळीने स्वत: प्रत्येक खेळाडूच्या फलंदाजी व गोलंदाजी तंत्राबद्दल त्यांना मार्गदर्शन केले. या दोघांकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असताना मुलांमध्येही कमालीचा उत्साह होता आणि ते या दोघांच्या सूचनांकडे लक्षपूर्वक अवलोकन करीत होते. या शिबिरासाठी पुण्यासह, अहमदनगर, शिरूर, दौंड, सातारा या शहरांमधूनसुद्धा खेळाडू आले होते.
सचिनसाठी स्पेशल दिवस
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस अगदी खास आहे. २९ वर्षांपूर्वी म्हणजे १५ नोव्हेंबर १९८९ रोजी सचिन तेंडुलकरने १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तानविरुद्ध कराची येथे झालेल्या कसोटी सामन्यात आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वकार युनूस, वसिम अक्रम आणि इमरान खान यांच्या भेदक माºयाला त्याने तोंड दिले होते. या सामन्यात त्याने १५ धावा केल्या होत्या.
गेली चार वर्ष मी क्रिकेट खेळतो. पण या शिबिरात मला फलंदाजी आणि गोलंदाजीची खूप काही तंत्र शिकायला मिळाली. सचिनच्या अकॅडमीच्या शिबिरात सराव करण्याची संधी मिळाली हेच मला अभिमानस्पद आहे. मला भारतातील नंबर १ चा लेगस्पिनर व्हायचे आहे. शेन वॉर्नसारखी गोलंदाजी करायची आहे. त्या दृष्टीने मी या शिबिरात माझ्या कोचकडून मार्गदर्शन घेतले आहे. त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने लेगस्पिनचे तंत्र समजावून सांगितले आहे. आज सचिनसरांबरोबर खेळताना माझा आनंद गगनात मावेनासा झाला.
- ऋषभ कुलकर्णी (वय ११) प्रशिक्षणार्थी
या चार दिवसांच्या शिबिरामुळे माझा मुलगा समर्थ याच्या फलंदाजी तंत्रांत बदल झाला आहे. तो गेली चार वर्षे क्रिकेट खेळतो. आज सचिनसरांनी स्वत: मुलांना दोन-तीन तास व्यवस्थित मार्गदर्शन केले त्यांच्या चुका समजावून सांगितल्या आहेत. या शिबिरात मिलिंद गुंजाळसरांनी त्याच्या स्टंन्समध्ये बदल केला आहे. त्याच्या फटके मारण्याच्या शैलीतसुद्धा सुधारणा केली आहे. या शिबिरामुळे मुलांना नक्कीच फायदा झाला आहे.
- दादासाहेब हेलावडे (पालक), शिरूर
चार दिवसांचे प्रशिक्षण शिबिर म्हणजे या ८ ते १० वयोगटातील खेळाडूंना योग्य दिशा देणारे ठरणार आहे. मुळांना ते काय करतात आणि का करतात हे त्यांना माहीत नसते. सराव कोणत्या पद्धतीने करावा, फलंदाजी कशी करावी, गोलंदाजी कशी टाकावी याचे मार्गदर्शन या मुलांना महत्त्वाचे ठरणार आहे. जे काही मुले येथे शिकतील ते त्यांना नक्कीच त्याच्या भविष्यात उपयोगी पडणार आहे. - तेजल हसबनीस, शिबिरातील प्रशिक्षक (भारतीय महिला संघाची खेळाडू)
या शिबिरात सराव करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. सचिनसरांबरोबर सराव करण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्यच. त्यांना इतक्या जवळून पहायला मिळेल हे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. चार दिवसांच्या शिबिरात मला खूप काही शिकायला मिळाले. तेजलताईनेसुद्धा माझ्या फलंदाजीतील आणि गोलंदाजीतील काही चुकांमध्ये सुधारणा केल्या आहेत. या शिबिराचा मला नक्कीच फायदा झाला आहे.
- नीलय काशिद
(वय ११), प्रशिक्षणार्थी
शौर्यला सचिनच्या अकॅडमीमध्ये चार दिवसांच्या शिबिरात सराव करण्याची चांगली संधी मिळाली हीच मोठी बाब आहे. त्याला येथे काही फलंदाजीमधील नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्या फलंदाजीमधील चुका येथील मार्गदर्शकांनी हेरून सुधारल्यासुद्धा आहेत. तो तीन वर्षांचा असल्यापासून क्रिकेट खेळत आहे. येथील मार्गदर्शक हे उच्च दर्जाचे आहेत. त्यांनी प्रत्येक खेळाडूंचा बारकाईने लक्ष देऊन अभ्यास केला आणि त्याच्या कामगिरीत सुधारणा केली. पुण्यातील आणि परदेशातील मार्गदर्शकसुद्धा मुलांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेत होते. मुलांच्या चुका त्याच्या कलाप्रमाणे त्यांना कशा सुधाराव्यात, असे समजावून सांगत होते. या शिबिरातील प्रत्येक खेळाडूला त्याच्या भावी क्रिकेट जीवनात नक्कीच फायदा होणार आहे. आणि आज सचिनसर जेव्हा स्वत: प्रत्येक खेळाडूकडे जातीने लक्ष देत होते, त्याच्याबरोबर राहून त्याच्या चुका समजावून सांगत होते, ही या मुलांच्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. आम्ही शौर्यला रोज अहमदनगर येथून आणत होतो आणि त्याला त्याचा नक्कीच फायदा झाला आहे.
- देविका देशमुख
(पालक) अहमदनगर
Web Title: Cricket permanently in my heart!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.