Join us  

"2 ऐवजी 1 कप चहा प्या, एसी कमी वापरा आणि ऑफिसमधून बाहेर पडताना लाइट बंद करा" 

ramiz raja : रमीज राजा यांची नियुक्ती झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. त्यांनी सर्वांना स्वत: ला सुधारण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 6:17 PM

Open in App

नवी दिल्ली :  जेव्हापासून रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारले आहे. तेव्हापासून ते व्यवस्थेमध्ये अनेक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या माजी फलंदाजाला अध्यक्षपदाच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीलाच एका मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. (cricket ramiz raja tells pcb staff and officials over cost cutting options to uplift pakistan cricket)

न्यूझीलंडनंतर, इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांनी पाकिस्तान दौरे रद्द केले, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आर्थिक नुकसानही झाले. आता, पाकिस्तानच्या काही माध्यमांच्या अहवालात असे समोर येत आहे की, रमीज यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या उन्नती आणि विकासासाठी खर्च कमी करण्याच्या सूचना बोर्डाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

एवढेच नव्हे तर रमीज राजा यांनी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ज्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रचंड पगार मिळत आहे, त्यांच्याशी बोलले आणि त्यांना अप्रत्यक्षपणे ताकीदही दिली. द न्यूजमधील एका अहवालानुसार, रमीज राजा यांनी बोर्ड अधिकारी, ग्राउंड स्टाफ आणि मॅनेजमेंटला सांगितले की, "आपण सर्वांनी आपल्या स्थितीला योग्य सिद्ध करण्यासाठी काम करावे लागेल. जर संघ नंबर -1 बनला नाही, तर आपण इथे असण्यात काही अर्थ नाही." 

अहवालानुसार, अध्यक्षांनी दावा केला की, त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अशा पद्धती शिकल्या आहेत जेणेकरून ते खर्च कमी करू शकतील. इम्रान खान यांनी पंतप्रधान निवास आणि कार्यालयातील खर्च वाचवण्याचे मार्ग स्पष्टपणे शेअर केले आहेत. याचबरोबर, रमीज राजा म्हणाले की, 'आम्हाला बोर्डाच्या खर्चात कपात करावी लागेल. 2 ऐवजी 1 कप चहा प्या, एअर कंडीशनरचा वापर कमी करा आणि कार्यालयातून बाहेर पडताना दिवे बंद करा. जर आमचा संघ जगातील नंबर 1 संघ बनला नाही, तर आपल्या सर्वांनी येथे असण्याचे काही कारण नाही. आम्हाला आमच्या उपस्थितीला योग्य सिद्ध करण्यासाठी काम करावे लागेल.'

दरम्यान, रमीज राजा यांची नियुक्ती झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. त्यांनी सर्वांना स्वत: ला सुधारण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. अगदी क्रिकेटपटूंनाही ते किती चांगली कामगिरी करू शकतात हे दाखवण्यास सांगितले आहे. राजा यांनी तळागाळात क्रिकेट सुधारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी स्थानिक स्तरावरील क्रिकेटमधील खेळपट्ट्यांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, जेणेकरून तरुणांना प्रशिक्षणासाठी अधिक चांगली परिस्थिती मिळेल.

टॅग्स :पाकिस्तान
Open in App