क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं ( CSA)त्यांच्या करारबद्ध खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळण्यास ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यास नकार दिला. CSA च्या या निर्णयावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) चांगलाच खवळला आहे.
CSA चे संचालक ग्रॅमी स्मिथ ( Graeme Smith) यांनी हा निर्णय घेतला आहे. ''दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक लक्षात घेता खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी NOC दिली जाणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व स्थानिक स्पर्धा यांना खेळाडूंनी प्राधान्य द्यायला हवं. न्यूझीलंड दौरा आणि बांगलादेशचा आफ्रिका दौऱ्यासाठी करारबद्ध खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यासाठी उपलब्ध असायला हवं. हाच नियम स्थानिक स्पर्धांसाठीही लागू होणार आहे, त्या स्पर्धाही लवकरच सुरू होतील,''असे स्मिथनं स्पष्ट केलं.
CSA च्या या निर्णयाचा मर्चंट डी लँगे, इम्रान ताहीर आणि रिली रोसोवू यांना काही फार फरक पडणार नाही. त्यांना CSA नं करार दिलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे आता मोहम्मद हुरैरा ( इस्लामाबाद युनायटेड) व साहीबजादा फरहान ( कराची किंग्स) यांची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. मुल्तान सुल्ताननं डेव्हिड विली. जॉन्सन चार्ल्स आणि बेन डंक, तर क्युएत्ता ग्लॅडीएटर्सनं शिमरोन हेटमायर यांना करारबद्ध केले आहे.
त्यांच्या या निर्णयावर आफ्रिदीनं तिखट प्रतिक्रिया दिली. Samaa TV वरील एका कार्यक्रमात आफ्रिदीनं CSAवर निशाणा साधताना आयपीएल व पीएसएल यांच्याबाबत CSA च्या दुटप्पीपणावर टीका केली. तो म्हणाला,''दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू न खेळल्यानं स्पर्धेचा दर्जा काही घसरणार नाही. पण, आम्हाला हे चांगले लक्षात आहे की, पाकिस्तानविरुद्धची मालिका सुरू असताना त्यांचे चार खेळाडू आयपीएल खेळत होते. तेव्हा क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं असे पाऊल का उचलले नव्हते?''
यावेळी आफ्रिदीनं भारतीय नियामक मंडळाच्या ( BCCI) जागतिक क्रिकेटमधील ताकदीचाही उल्लेख केला. ''BCCI आर्थिकदृष्ट्या प्रचंड कणखर आहे हे मान्य करायला हवं आणि त्यांच्या क्रिकेट पॉलिसी चांगल्या आहेत. त्यांच्याकडून प्रचंड पैसा मिळतो, म्हणून प्रत्येकाला भारताविरुद्ध खेळावेसे वाटते,''असे आफ्रिदी म्हणाला.
''दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आर्थिकदृष्ट्या तितके सक्षम नाहीत आणि म्हणूनच आम्ही मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यामाध्यमातून जागतिक क्रिकेटमध्ये दर्जा सुधारण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व BCCI यांची तुलना होणं शक्य नाही. बीसीसीआयकडे एवढा पैसा आहे, की ते काहीही खरेदी करू शकतात.''