मुंबई : मी मुंबई क्रिकेट पाहून मोठा झालो आहे. त्यामुळे हलका चेंडू, मग तो खेळाच्या मैदानात असो की राजकारणातला तो कसा फटकवायचा असतो, हे माहीत आहे. हा लूज बॉल सोडला, तर संधी हुकते. आपणहून कधीच स्वत:ची विकेट फेकायची नसते, हे क्रिकेटमधून शिकलो,’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियवर ‘बोलंदाजी’ केली.
लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने शुक्रवारी वानखेडे स्टेडियवर विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी स्टेडियममधील हॉस्पिटॅलिटी बॉक्सचे ‘सुनील गावसकर हॉस्पिटॅलिटी बॉक्स’ असे नामकरण करण्यात आले. तसेच नॉर्थ स्टँडला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले.
एमसीएकडून दिवंगत क्रिकेटपटू माधव मंत्री जन्मशताब्दी वर्षही साजरे करण्यात येत असून यानिमित्त त्यांना मानवंदनाही देण्यात आली. यावेळी माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर मुख्यमंत्री ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलीप वेंगसरकर स्टँडचे, तर पवार यांनी सुनील गावसकर हॉस्पिटॅलिटी बॉक्सचे उद्घाटन केले.
- टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी भारतीय खेळाडूंवर, विशेष करून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर वाईट टीका केली होती. याबाबत खंत व्यक्त करत एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ‘भारत-पाक सामन्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या अशोभनीय होत्या. अशा प्रतिक्रिया कधीही उमटल्या नाही पाहिजे.
- क्रिकेटप्रेमींनी संयम बाळगावा. खेळामध्ये जय-पराभव होत असतात. आपल्या खेळाडूंच्या पाठिशी उभे रहा आणि मला विश्वास आहे की न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना आपण नक्की जिंकू. त्यानंतर नक्कीच आपल्याला वेगळं चित्र पाहण्यास मिळेल.’
Web Title: Cricket teaches how to hit a loose ball - CM Uddhav Thackeray speech in honor of Sunil Gavaskar and Dilip Vengsarkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.