मुंबई : मैदानावरील पंच कधी काय करतील याचा नेम नाही. सध्याच्या घडीला मैदानातील पंचांचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायलला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये पंचांनी एक वेगळीच कृती केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. पण थोड्यावेळाने सर्व वातावरण निवळल्याचे पाहायला मिळाले.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानबाबत हा किस्सा घडला आहे. सध्याच्या घडीला रशिद हा बिग बॅश लीगमध्ये मेलबर्नच्या संघाकडून खेळत होता. यावेळी अॅडलेडच्या संघाची फलंदाजी होती. या सामन्याच्या १७व्या षटकात ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले.
रशिदने एक चेंडू टाकला. तो फलंदाजाच्या पॅडवर आदळला. फलंदाज स्टम्पच्या लाईमध्येच खेळत होता. त्यामुळे रशिदने जोरदार अपील केली. त्यावेळी पंचांनी आपला हात वर केला. पंच जसे एखाद्या खेळाडूला बाद देताना हात वर करतात, तसाच त्यांनी हात वर केला. त्यावेळी रशिदला वाटले की आपण फलंदाजाला बाद केले आहे, पण त्यानंतर भलतीच गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले.
पंचांनी आपला हात वर केला, तेव्हा फलंदाजाला आता ते बाद ठरवणार असे वाटले होते. पण पंचांनी बाद देण्याची कृती केलीच नाही. त्यांनी तो हात आपल्या नाकाजवळ नेला आणि नाक साफ करण्याचे कृत्य केले. यानंतर स्टेडियममध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.