Olli Pope catch Video, Eng vs NZ 2nd test: इंग्लंडचा कसोटी संघ गेल्या सात-आठ महिन्यांपासून आपल्या आक्रमक आणि स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. इंग्लंडचा संघ पाकिस्तानात आणि आता न्यूझीलंडमध्येही तो चांगली कामगिरी करत आहे. ही सकारात्मक विचारसरणी केवळ फलंदाजीतच नाही, तर प्रत्येक आघाडीवर दिसत आहे. इंग्लंडचा कसोटी संघ एका वेगळ्याच ऊर्जेने खेळताना दिसत आहे. नुकताच त्यांच्या खेळाडूचा क्षेत्ररक्षणातील कामगिरीची व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ओली पोपने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये घेतलेले अफलातून झेल सध्या चर्चेत आहेत.
वेलिंग्टन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी हॅरी ब्रूकचे धडाकेबाज शतक आणि जो रूटच्या झुंजार शतकाच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर मात केली. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी न्यूझीलंडच्या नाकी नऊ आणले. जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांच्यासमोर किवी फलंदाज क्रीझवर फार काळ टिकू शकले नाहीत. यात ओली पोपच्या उत्कृष्ट झेलचाही मोठा वाटा होता, त्याने दोन अप्रतिम झेल घेऊन सामन्यात मोठी भूमिका बजावली.
आधी डावीकडे उडी मारत घेतला कॅच!
लीच आणि पोपच्या एकत्रित कामगिरीचा पहिला पहिला बळी हेन्री निकल्स ठरला. डावखुरा फलंदाज निकल्सने लीचच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळला पण तो अपयशी ठरला. चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला आदळला आणि शॉर्ट लेगच्या दिशेने उसळला, जिथे पोप फिल्डिंग करत होता. चेंडू पोपपासून थोडा दूर होता पण इंग्लिश क्षेत्ररक्षकाने त्याच्या डावीकडे उडी मारली आणि एका हाताने उत्कृष्ट झेल घेत न्यूझीलंडला धक्का दिला.
नंतर उजवीकडे झेप घेत टिपला अफलातून झेल!
काही वेळाने पोपला आणखी एक संधी मिळाली आणि त्याचेही त्याने सोनं केलं. यावेळी उजव्या हाताचा फलंदाज डॅरेल मिचेलने फ्रंटफूटवर खेळत लीचच्या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा उसळी घेत असतानाच पोपने सिली पॉईंटवर पटकन झेल टिपला. केवळ हाताने त्याने तो झेल अतिशय उत्तम रितीने टिपला आणि सामन्यात न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला.
दरम्यान, २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड १-०ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडची अवस्था वाईट आहे. दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून त्यात इंग्लंडने पहिला डाव ४३५ धावांवर घोषित केला. त्यानंतर न्यूझीलंडची अवस्था मात्र दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद १३८ अशी आहे.