Join us  

विराटनं कर्णधार म्हणून 100वा टेस्ट खेळावा अन्...; BCCI ची होती मोठी इच्छा, पण...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, विराटने आपण या फॉरमॅटचेही कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 5:12 PM

Open in App

नवी दिल्ली - विराट कोहलीने तिनही फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. मात्र आता तो एक खेळाडू म्हणून संघाचा भाग असेल. टी-20 नंतर आता त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्णधार म्हणून कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळल्यानंतर त्याने आपले कर्णधार पद सोडावे, असा प्रस्ताव बीसीसीआयकडून देण्यात आला होता. खरे तर विराट आयपीएल फ्रँचायझीचे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूमध्ये कर्णधार म्हणून शेवटा सामना खेळू शकला असता.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, विराटने आपण या फॉरमॅटचेही कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर एक नोट जारी करत त्याने आपले 7 वर्षांचे कसोटी कर्णधारपद सोडण्यासंदर्भात माहिती दिली. याच वेळी त्याने बीसीसीआय आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचेही आभार मानले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोहलीने बीसीसीआयला सांगितले की, तो कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. यावर, कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध बेंगळुरू कसोटी सामना खेळल्यानंतर त्याने हे पद सोडावे, असा प्रस्ताव बोर्डाकडून त्याला देण्यात आला होता. मात्र यासंदर्भात, "एका सामन्याने फारसा फरक पडणार नाही, मी तसा नाही," असे कोहलीचे म्हणणे होते.

महत्वाचे म्हणजे, विराटने आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. 100 वा कसोटी सामना खेळल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडावे अशी बोर्डाची इच्छा होती. कोणत्याही खेळाडूच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना महत्त्वाचा असतो. कारण सर्वांनाच हा टप्पा गाठण्याची संधी मिळत नाही. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा केली होती.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App