मेलबोर्न : चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा उपयोग करण्यावर बंदी आल्यास क्रिकेट फारच नीरस होण्याचा धोका आहे. चेंडू आणि बॅट यांच्यातील द्वंद्व संतुलित न ठेवल्यास खेळातील रोमांचकता संपुष्टात येण्याची भीती आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने मंगळवारी व्यक्त केली. लाळेचा वापर होणार नसेल तर भविष्यात युवा क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज बनण्यास धजावणारदेखील नाहीत, असे स्टार्कचे मत आहे.
‘गोलंदाजांचे महत्त्व कमी करून फलंदाजांना झुकते माप मिळावे हे क्रिकेटच्या नैसर्गिक नियमांविरुद्ध आहे. चेंडू स्विंग झाला तरच खेळातील रोमांच कायम राहील. असे न झाल्यास लोक क्रिकेट पाहणार नाहीत, शिवाय नव्या दमाचे खेळाडू वेगवान गोलंदाज बनणार नाहीत. आॅस्ट्रेलियात मागील काही वर्षांत आमच्या खेळपट्ट्या ‘पाटा’ झाल्या आहेत.
चेंडू सरळ बॅटवर आल्यास क्रिकेट फारच नीरस होण्याचा मोठा धोका आहे,’ असे मत स्टार्कने मांडले. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या नेतृत्वाखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने अलीकडे कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी चेंडूवर लाळेचा उपयोग न करण्याची शिफारस केली होती. सद्यस्थितीत चेंडूवर लाळेचा वापर करण्यात धोका असेल तर आयसीसीने लाळेऐवजी अन्य वस्तूंचा वापर करण्याची परवानगी द्यायला हवी, असे मत व्यक्त करीत स्टार्क पुढे म्हणाला, ‘कोरोनाच्या प्रकोपामुळे लाळेचा वापर थांबवायचा असेल तर काही काळासाठी अन्य कुठल्या तरी पर्यायावर विचार करण्याची गरज आहे.’ (वृत्तसंस्था)
गुलाबी चेंडूने डे-नाईट कसोटी व्हावी
भारताच्या आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्यात मिशेल स्टार्क याने गुलाबी चेंडूवर कसोटी खेळवण्याची मागणी केली. तो म्हणाला, ‘भारताविरुद्ध मालिकेत गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळण्यास मजा येईल. चाहत्यांनाही सामना पाहायला आवडेल. गुलाबी चेंडूवर गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे युद्ध रंगते. भारताने याआधी घरच्या मैदानावर गुलाबी चेंडूवर एक सामना खेळला आहे, त्यामुळे ते परिस्थितीशी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, अशातला भाग नाही. मात्र आकडेवारी तपासली तर गुलाबी चेंडूवर आमच्या संघाने घरच्या मैदानावर अधिक चांगली कामगिरी केली आहे.’
भारताने काही वर्षांपूर्वी गुलाबी चेंडूवर सामना खेळण्यास बीसीसीआयचा नकार होता. मात्र सौरव गांगुलीकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर, भारताने ईडन गार्डन्स मैदानावर बांगलादेशविरुद्ध पहिला गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळला. या सामन्यात भारताने बाजी मारली होती. याउलट आॅस्ट्रेलिया २०१५ पासून डे-नाईट कसोटी खेळत आहे.