पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने ( Abdul Razzaq ) ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर निशाणा साधला आणि तो म्हणाला की भारताचा पराभव म्हणजे 'क्रिकेट जिंकली'.
नुकत्याच झालेल्या चर्चेत त्याला वर्ल्ड कप फायनलबद्दल विचारले गेले आणि त्याने भारतावर घरच्या परिस्थितीचा त्यांच्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप केला आणि म्हटले की ऑस्ट्रेलियावर भारताचा विजय हा 'क्रिकेटसाठी दुःखाचा क्षण' ठरला असता. रज्जाकने यापूर्वी पाकिस्तान संघाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा संदर्भ घेऊन वाद ओढावून घेतला होता आणि टीका झाल्यानंतर त्याला माफी मागावी लागली होती.
तो म्हणाला, खरं सागांयचं झालं तर आज क्रिकेट जिंकलं आहे. तुम्ही घरच्या खेळपट्टींचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला, हे यापूर्वी कधी झाले नाही. भारतीय संघ जिंकला असता तर क्रिकेट हरलं असतं.. या खेळाने दाखवून दिले की धाडसी खेळाडूंचा तो खेळ आहे. जो मानसिक कणखर असतो, मेहनत घेतो, जीव तोडून खेळतो, क्रिकेट त्याच्याच बाजूनं उभं राहतं. भारत जिंकला असता तर आम्हाला वाईट वाटलं असतं, कारण त्यांनी खेळपट्टी त्यांच्यासाठी तयार केल्या होत्या. निष्पक्ष खेळपट्टी हवी होती, जी दोन्ही संघांसाठी संतुलित असेल. पण, भारत हरला हे क्रिकेटसाठी बरं झालं.''
भारतीय संघाने फायनलमध्ये २४० धावा केल्या. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या अर्धशतकानंतरही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सामन्यावर दबदबा राखला. प्रत्युत्तरात ३ बाद ४७ धावांवरून ऑस्ट्रेलियाने मुसंडी मारली. ट्रॅव्हीस हेडने शतक झळकावले आणि अर्धशतक झळकावणाऱ्या मार्नस लाबुशेनसोबत १९५ धावांची विक्रमी भागीदारी केली.