गांगुलींच्या स्वास्थ्यासाठी क्रिकेट जगताची प्रार्थना

Saurav Ganguly: यंदा एप्रिल-मे मध्ये बंगाल विधानसभेची निवडणूक प्रस्तावित आहे. सौरव राजकारणात येणार अशी चर्चा असताना त्यांच्यावर हा आघात झाला. सौरव भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असाही तर्क लावला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 05:13 AM2021-01-03T05:13:18+5:302021-01-03T05:13:29+5:30

whatsapp join usJoin us
Cricket world prays for Ganguly's health | गांगुलींच्या स्वास्थ्यासाठी क्रिकेट जगताची प्रार्थना

गांगुलींच्या स्वास्थ्यासाठी क्रिकेट जगताची प्रार्थना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रिकेट आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी प्रार्थना केली आहे.
कोहलीने ट्विट केले, ‘तुम्ही लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. लवकर बरे व्हा.!’ सचिन म्हणाला, ‘आताच सौरव यांच्या आजाराची माहिती कळाली. ते लवकर बरे होतील अशी आशा आहे.’


बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले, ‘गांगुली उपचाराला झपाट्याने प्रतिसाद देत आहेत. मी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. मी त्यांच्या कुटुंबीयांसोबतही संवाद साधला.’ आयसीसीनेदेखील गांगुलीच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत चिंता व्यक्त करीत लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.
 वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, अनिल कुंबळे आणि गौतम गंभीर या माजी सहकाऱ्यांनी गांगुली लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त केली. सेहवागने लिहिले, ‘दादा लवकर बरे व्हा. तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो.’ गंभीर म्हणाला, ‘तुम्ही लवकर बरे व्हा. स्वत:ची काळजी घ्या. ईश्वर तुमचे रक्षण करो.’
प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड  यांनीदेखील गांगुली यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. हृदयविकारातून गांगुली लवकर बरे होवोत,’ असे राज्यपालांनी म्हटले आहे.


यंदा एप्रिल-मे मध्ये बंगाल विधानसभेची निवडणूक प्रस्तावित आहे. सौरव राजकारणात येणार अशी चर्चा असताना त्यांच्यावर हा आघात झाला. सौरव भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असाही तर्क लावला जात आहे. गांगुलींनी मात्र राजकारणात प्रवेशाचे अद्याप संकेत दिलेले नाहीत. काही दिवसांआधी त्यांनी बंगालच्या राज्यपालांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट होती, असे नंतर खुद्द सौरवनीच स्पष्ट केले होते.
ऑक्टोबर २०१९ला मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या आमसभेत गांगुलींची अध्यक्षपदी निवड झाली होती. ते बीसीसीआयचे ३९ वे अध्यक्ष आहेत. 

ममता बॅनर्जी यांचे ट्विट...
गांगुलीबद्दलची माहिती ऐकताच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करत चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘गांगुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचे ऐकून वाईट वाटले. सौरव लवकर बरा व्हावा, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझ्या संवेदना त्याच्या कुटुंबीयांसोबत आहेत.’
 

Web Title: Cricket world prays for Ganguly's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.