हैदराबाद, दि. 1 - भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अंबाती रायडू सध्या चांगलाच चर्चेत आहे. अंबाती रायडूने रागाच्या भरात एका ज्येष्ठ नागरिकावर हात उचलल्याचं समोर आलं आहे. अंबाती रायडू धक्काबुक्की करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओमध्ये अंबाती रायडू ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओत दिसत असल्यानुसार, अंबाती रायडू आपल्या काळ्या रंगाच्या कारमधून उतरतो आणि ज्येष्ठ नागरिकावर हात उचलतो. एएनआयने हा व्हिडीओ जारी केला आहे.
या व्हिडीओची सत्यता तपासली जात आहे. मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अंबाती रायडू आपल्या काळ्या गाडीसोबत दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर ही ज्येष्ठ व्यक्ती गाडी वेगाने चालवण्याचा विरोध करत असल्याचं दिसत आहे. यावरुनच नाराज झालेल्या अंबाती रायडूने संतापाच्या भरात धक्का देत मारामारी करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकानेही यावेळी अंबाती रायडूवर हात उचलला होता. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी मधे पडत दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला.
अंबाती रायडूने आतापर्यंत 34 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. 34 सामन्यांमध्ये त्याने एकूण 1055 धावा केल्या आहेत. झिम्बाम्बेविरोधात तो शेवटचा सामना खेळला होता. अंबाती रायडू इंडियन प्रिमिअर लीगमध्येही खेळत असून, मुंबई इंडियन्स संघाकडून तो खेळतो.
अंबाती रायडू आणि वाद हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. याआधी सहयोगी खेळाडूसोबतदेखील अंबाती रायडूचं भांडण झालं आहे. 2005 रोजी अंबाती रायडू आणि अर्जून यादव नावाच्या एका क्रिकेटरचं भांडण झालं होतं. आंध्र प्रदेशात रणजी सामना सुरु असताना मैदानावर दोघे भिडले होते. अर्जून आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव शिवपाल यादव यांचा मुलगा आहे.
मैदानातच भिडले अंबाती रायडू आणि हरभजन सिंगआयपीएल सीजन ९ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात हरभजन सिंग आणि अंबाती रायडूमध्ये वादावादी झाली होती. दोन्ही खेळाडू एकमेकांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. याची चर्चा पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर रंगली होती. त्याचे झाले असे होते की, हरभजनच्या गोलंदाजीवर सौरव तिवारीने जोरदार फटका मारला. तो चेंडू सीमारेषेवर अडविण्याचा अंबाती रायडूने भरपूर प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटून सीमापार गेला. त्यानंतर हरभजन सिंगने अंबाती रायडूवर नाराजी व्यक्त केली. यावेळी हरभजन रायडूला उद्देशून काहीतरी पुटपुटला. त्यानंतर रायडूनेही त्याला सुनावले. दोघांचे हे प्रकरण हमरीतुमरीवर आले. त्यानंतर भज्जीने वेळ मारून नेत अंबाती रायडूला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र रायडूने भज्जीचा हात झटकला आणि सीमारेषेवर निघून गेला