नवी दिल्ली : लहानपणापासून त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते. परिस्थिती बेताचीच होती. सुरुवातीला त्याने फलंदाजीचे धडे गिरवले, त्यानंतर तो गोलंदाजी करायला शिकला. भारतीय संघात त्याने स्थान पटकावले, पण जम बसत नव्हता, त्यावेळी क्रिकेट सोडून ट्रक ड्रायव्हर होण्याचा विचार त्याने केला होता. ... अन आज आहे त्याचा वाढदिवस.
पाच बहिणींची जबाबदारी त्याच्यावर होती, कारण घरात तो एकटा मुलगा होता. सुरुवातीला चरणजीत सिंग भुल्लर यांनी त्याला फलंदाजीचे प्रशिक्षण दिले. पण त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर तो देविदर अरोरा यांच्याकडे शिकायला गेला, त्यांनी त्याला गोलंदाजी शिकवली. भारतासाठी 1998 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पदार्पण केले, त्याला यश मात्र मिळाले नाही. त्यामुळे तो क्रिकेट सोडण्याचा विचार करत होता.
त्यानंतर त्याला 1999-2000 सालीही संधी देण्यात आली. त्यावेळी त्याला चमक दाखवता आली नाही. त्यामुळे कुटुंबासाठी आता क्रिकेट सोडून ट्रक चालवायचा, असे त्याने ठरवले, पण तसे केले नाही, नाहीतर तुम्हाला हरभजन सिंगसारखा क्रिकेटपटू दिसला नसता. ही गोष्ट आहे ती भारताचा क्रिकेटपटू हरभजनची. आजच्या दिवशी 1980 साली त्याचा जन्म झाला, त्यामुळे त्याची अशी ही क्रिकेटमधली एक आठवण.