- सचिन कोरडे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात आजही गोमंतकीय म्हणून जे नाव सन्मानाने घेतले जाते ते म्हणजे दिलीप सरदेसाई. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून दिलीप सरदेसाई यांनी आपला काळ गाजवला. त्यांचे क्रिकेटमधील योगदान महत्त्वपूर्ण आहे. सरदेसाई यांच्या क्रिकेट आठवणींना गोव्यात उजाळा देण्यात आला. आंतरराष्ट्रीय चित्रकार सोलमन सोझा यांनी सेरेंडिपिटी महोत्सवानिमित्त दिलीप सरदेसाई यांचे चित्र पणजीतील एका मोठ्या इमारतीच्या भिंतीवर रेखाटले आहे. हे चित्र लक्षवेधी ठरत आहे.
सेरेंडिपिटी महोत्सवानिमित्त गोव्यातील विविध ठिकाणी मोठमोठ्या भिंतीवर सोलमन सोझा आपल्या कल्पनेतून विविध चित्रे रेखाटत आहेत. त्याच्या कल्पनेला आणि कलेला अनेकांची दाद मिळत आहे. या वेळी त्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि गोमंतकीय दिलीप सरेदसाई यांचे अप्रतिम चित्र रेखाटले. हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांना काही दिवसांचा अवधी लागला. या चित्रात सरदेसाई हे आपला आवडता स्ट्रोक मारताना दिसत आहेत.
सरदेसाई यांचा जन्म १९४० मध्ये झाला होता. ते मडगाव येथे वाढले. त्यावेळी गोव्यात साधनसुविधाही नव्हत्या. १९५७ मध्ये शिक्षणासाठी ते मुबंईत आले तेव्हा ते अवघ्या १७ वर्षांचे होते. त्यानंतर मुंबईत क्रिकेटर म्हणून त्यांचा कार्यकाळ सुरू झाला. त्यांनी ३० कसोटी सामन्यांत दोन हजारांहून अधिक धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या १० हजार धावांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गोव्यात शासनातर्फे दिलीप सरदेसाई यांच्या नावाने क्रीडा नैपुण्य पुरस्कार दिला जातो.
''मला व्हॉट्सअॅपवर दिलीप सरेदसाई यांचे चित्र मिळाले. हे चित्र सोलमन सोझा यांनी रेखाटल्याचे कळताच खूप आनंद झाला. या महोत्सवानिमित्त दिलीप सरेदसाई यांच्या स्मृतींना उजाळा मिळालाय. हा एक सन्मान आहे. मात्र, चित्राखाली त्यांची माहिती दिली गेली असती तर अधिक बरे झाले,''असे दिलीप सरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी सरदेसाई यांनी सांगितले.
Web Title: Cricketer Dilip Sardesai's 'Masterstroke' wall painting in goa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.