नवी दिल्ली-
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं मुंबईतील अंधेरी येथील त्याचा आलिशान फ्लॅट विकला आहे. रिअर इस्टेट डीलवर नजर ठेवणाऱ्या Zapkey.com नं दिलेल्या माहितीनुसार हरभजन सिंग यानं डिसेंबर २०१७ साली मुंबईत १४.५ कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. आता तोच फ्लॅट हरभजननं १७.५८ कोटी रुपयांनी विकल्याची माहिती समोर आली आहे.
अंधेरीत रुस्तमजी एलिमेंट्स सोसायटीच्या ९ व्या मजल्यावर हरभजननं २८३० स्वेअर फूटांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटसाठी हरभजन यानं ८७.९ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. फ्लॅटसोबतच सोसायटीमध्ये ४ पार्किंग स्पेस जागा देखील खरेदीदाराला वापरता येणार आहे. रुस्तमजी एलिमेंट्स बिल्डींगमध्ये ३,४ आणि ५ बीएचके फ्लॅट्स उपलब्ध आहेत.
कोरोनानंतर आता रिअल इस्टेटमध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. हरभजननं नुकतंच यूट्यूबवर हरभजन टर्बनेटर सिंग नावाचं चॅनल सुरू केलं आहे. याशिवाय हरभजन न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत समालोचन करतानाही दिसणार आहे.