कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले होते. प्रतापगडचे रहिवासी असलेले ३५ वर्षांचे तिवारी यांनी हावडाच्या शिवपूर मतदारसंघात ३२ हजार मतांनी विजय नोंदवून थेट विधानसभेत धडक दिली.सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मनोज तिवारी यांचा क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी क्रिकेटपटू मनोज तिवारी आपल्या पत्नीसमवेत टीएमसीमध्ये दाखल झाले होते. भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जोरदार प्रचारानंतर त्यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर आता त्यांना राज्यमंत्रिपददेखील मिळाले. सध्या ते पत्नी, मुले, वडील श्यामशंकर तिवारी, आई बीना तिवारी, लहान भाऊ राजकुमार व महेश यांच्यासोबत कोलकाता येथे वास्तव्यास आहेत.
- मनोज तिवारी भारतीय संघांसाठी १२ एकदिवसीय, तर तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांत त्यांनी एक शतक तसेच एका अर्धशतकासह २८७ धावा काढल्या. १०४ धावा ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.- मनोज तिवारी यांना ९८ आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी २८.७२ च्या सरासरीने १६९५ धावा काढल्या. आयपीएलमध्ये ७५ धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघातून सामने खेळले.- २००६-०७ मध्ये रणजी करंडकातील त्यांचा पराक्रम कोणालाही विसरता येणार नाही. यावर्षी मनोज तिवारी यांनी ९९.५०च्या सरासरीने ७९६ धावा काढल्या होत्या. या कामगिरीमुळे त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांची संघात निवड झाली.