मुंबई : यूएईमध्ये सुरु असलेल्या यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) ने अर्धा टप्पा पार केला असून बीसीसीआयने आता महिलांच्या आयपीएलचीही घोषणा केली. मिताली राज (Mithali Raj), स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांना कर्णधार नेमले असून मिताली वेलोसिटी, स्मृती ट्रेलब्लेझर्स व हरमनप्रीत सुपरनोवास संघांचे नेतृत्त्व करतील. यासाठी सगळे खेळाडू आता क्वारंटाईन झाले असून आजच भारताच्या आक्रमक सलामीवीर फलंदाजाचा वाढदिवसही आहे. मात्र क्वारंटाईनमध्ये एकटीलाच हॉटेल रुममध्ये यंदा स्वत:चा बर्थ डे साजरा करावा लागणार असल्याची पोस्ट तिने टाकली आहे. ही क्रिकेटपटू आहे मुंबईची पूनम राऊत (Poonam Raut).
४ नोव्हेंबरपासून या तीन संघांचा समावेश असलेल्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धाही यूएईमध्येच होणार असून ९ नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल. महिलांच्या या स्पर्धेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशातील खेळाडूंचाही समावेश असेल.
या स्पर्धेला सराव करण्याआधी सर्व महिला खेळाडू क्वारंटाईन झाले आहेत. आज पूनमचा वाढदिवस असून क्वारंटाईन काळामध्ये दरवर्षीप्रमाणे जल्लोषात तिला बर्थ-डे सेलिब्रेशन करता येणार नाही. असा प्रसंग पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात आल्याने, तिने त्याच आशयाची एक पोस्ट आणि फोटो सोशल मीडीयावर टाकली आहे. चाहत्यांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. १३ ऑक्टोबरपासून क्वारंटाईन झाल्यानंतर दुसºयाच दिवशी तिचा वाढदिवस आला आहे. स्पर्धेसाठी अत्यंत उत्सुक असून यंदाचा वाढदिवस एकटीने साजरा करणार असल्याचे तिने आपल्या पोस्ट म्हटले आहे.
पूनमने भारतासाठी ६७ सामने खेळताना ३२.३२ च्या सरासरीने २००४ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तिने ३५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्त्व करताना ९२.१७च्या स्ट्राईक रेटने ७१९ धावा केल्या आहेत. यामध्ये तिने चार अर्धशतके झळकावली असून ७५ धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. त्याचप्रमाणे, पूनमने २ कसोटी सामने खेळताना ४८.६६ च्या सरासरीने १४६ धावा केल्या आहेत. एक जबरदस्त शतकी खेळी करताना १३० धावांची सर्वोत्तम खेळी तिने केली आहे.
Web Title: cricketer poonam raut to celebrate her birthday alone due to quarantine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.