क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना १२ लाखांच्या दंडाची नोटीस

रीळ येथे समुद्रकिनारी केलेले बांधकाम, वाळू उत्खनन वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:10 PM2024-08-23T19:10:06+5:302024-08-23T19:11:12+5:30

whatsapp join usJoin us
Cricketer Praveen Amre fined notice of 12 lakhs Allegation of illegal sand mining | क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना १२ लाखांच्या दंडाची नोटीस

क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना १२ लाखांच्या दंडाची नोटीस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रत्नागिरी : तालुक्यातील जयगडजवळील रीळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत भारताचा क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी समुद्रकिनारी केलेले बांधकाम आणि वाळू उत्खनन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून, बेकायदेशीरपणे वाळू उपसा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरीच्या तहसीलदारांनी आमरे यांना नाेटीस बजावली आहे. या नाेटीसद्वारे दंड म्हणून १२ लाख ६५ हजार रुपये का वसूल करण्यात येऊ नयेत, अशी विचारणा केली आहे.

रीळ येथील या बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत माहिती अधिकार महासंघाचे राज्य सचिव समीर शिरवाडकर यांनी अर्ज दिला हाेता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी नाेटीस बजावली आहे. या नाेटीसमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रीळ येथील जागेत अनधिकृत वाळूचे उत्खनन व भराव केल्याचे जयगड मंडळाधिकारी व चाफेरी तलाठी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

चाफेरीचे तलाठी यांच्या अहवालानुसार २५ ब्रास विनापरवाना वाळूचे उत्खनन व भराव केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ (७) अन्वये दंडात्मक कार्यवाहीस पात्र असल्याचे म्हटले आहे. अनधिकृत वाळूचे उत्खनन व साठा केल्यामुळे पाचपट दंड १२,५०,००० रुपये व राॅयल्टीची रक्कम १५,००० रुपये असे एकूण १२,६५,००० रुपये का वसूल करू नये, असे नाेटीसमध्ये म्हटले आहे.

तसेच चिरेबंदी कुंपणाचे अनधिकृत बांधकाम केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. या बांधकामासाठी काेणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतलेली असल्याचे दिसून येत नाही, असे नाेटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ व ४५ अन्वये आपण कार्यवाहीस पात्र आहात, असेही म्हटले आहे.

याप्रकरणी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटिसाला लेखी उत्तर न दिल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही नाेटीसमध्ये म्हटले आहे.

‘ते’ खुलासा करणार

अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्याप्रकरणी प्रवीण आमरे यांना नाेटीस बजावण्यात आली आहे. या नाेटिसीला उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या नाेटिसीबाबत ते खुलासा करणार असून, या खुलाशानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

Web Title: Cricketer Praveen Amre fined notice of 12 lakhs Allegation of illegal sand mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.