लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नागरिकांनी सहाकर्य करावे म्हणून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. तरीही बेबंद होऊन रस्त्यावर गर्दी करणाऱ्या नागरिकांना थोपवायचे कसे, हा प्रश्न कायम आहे. प्रशासनाच्या मदतीसाठी सांगलीची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आता पुढे सरसावली आहे.
कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन स्मृतीने केले आहे. ती म्हणते, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तिला थोपविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू या. आजही अनेक जण अनावश्यकरीत्या घराबाहेर पडतात. अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत. चला, आज आपण सगळे निश्चय करू या. मी जबाबदार, मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार कोरोनाला हरवणार. मी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणार. वारंवार हात धुणार, सॅनिटायझरचा वापर करणार, सामाजिक अंतर पाळणार, कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणार आणि कोरोनावर मात करणार. स्मृतीने असेही आवाहन केले की, कोविडसाठीची लस पूर्णत: सुरक्षित आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ४५ वर्षांवरील सर्वांनी ती घेतली पाहिजे. लवकरच १८ वर्षावरील नागरिकांना लस मिळेल. आपण सुरक्षित राहिलो, तरच देश सुरक्षित राहील.