भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग याची बहिण अंजू सेहवाग-मेहरवाल यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. अंजू या विरेंद्र सेहवागची मोठी बहिण आहेत. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आम आदमी पक्षाने राजकारणात नवनवे पायंडे पाडले आहेत. मला आपच्या परिवारात सामील करून घेतल्याबाबत सर्वांचे आभार. या पक्षात माझ्या जी जबाबदारी सोपवली जाईल, ती जबाबदारी मी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. कोणत्याही परिवारात सामील होताना जबाबदाऱ्या आधी येतात आणि मग इतर गोष्टी येतात. या परिवारातील मी सर्वात लहान सदस्य असल्याने माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल ती मी नक्कीच पूर्ण करेन", असं मत अंजू यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केलं.
अंजू यांचा जन्म हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यातील छुड्डानी या गावी झाला. दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती चौधरी रविंद्र सिंह मेहरवाल यांच्याशी अंजू यांचा विवाह झाला. त्यानंतर अंजू यांनी समाजकार्याला सुरूवात केली आणि कालांतराने राजकीय कारकिर्दीलाही सुरूवात केली. २०१२च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दक्षिणपुरी विस्तारित या वॉर्डमधून त्या निवडून आल्या.
"आम आदमी पक्षाच्या कार्याच्या कक्षा आता रूंदावत आहेत. आपच्या कार्याची पद्धत ही भ्रष्टाचारमुक्त राजकारण अशी आहे. मी समाजसेवा करणारी स्त्री आहे. त्यामुळे मला आपच्या कार्यातून प्रेरणा मिळाली आणि मी आपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. कारण समाजसेवेसह राजकारणाच्या माध्यमातून देशातील लोकांची सेवा करण्यासाठी माझंही योगदान असावं म्हणून मी पक्षप्रवेश करत आहे", असंही त्यांनी सांगितलं.