भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) नवा प्रमुख असेल. यापूर्वी राहूल द्रवीड एनसीएचा प्रमुख होता. तो आता भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. यापूर्वी लक्ष्मणने या पदासाठी नकार दिला होता. मात्र आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी त्याला तयार केले आहे. भारत 'अ' संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर लक्ष्मण ही नवी जबाबदारी स्वीकारू शकतो.
राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर, एनसीए प्रमुख पदाची जागा रिक्त होते. एनसीएची धुरा आता व्हीव्हीएसकडे जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण लक्ष्मणकडून यावर कसलेही उत्तर येत नव्हते. अखेर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी समजावल्यानंतर, लक्ष्मणने ही जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी, राहुल द्रविडलाही सौरव गांगुली यांनीच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्यास राजी केले होते.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक होता लक्ष्मण -व्हीव्हीएस लक्ष्मण आता कॉमेंट्री करण्याबरोबरच आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शकही होता. ही जबाबदारी तो गेल्या अनेक दिवसांपासून साभळत होता. पण आता सनरायझर्स हैदराबादशीही लक्ष्मणचे बोलणे झाले आहे. लक्ष्मणने टीम इंडियासाठी 134 टेस्ट आणि 86 वनडे सामने खेळले आहेत.