भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कॅन्सरशी संघर्ष सुरू असताना त्याने क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.. कॅन्सरवर मात करून त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि काही अविस्मरणीय खेळीही केल्या. कॅन्सरशी संघर्ष करताना आलेल्या अनुभवातून धडा घेत त्यानं YouWeCan या NGO ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून अनेक गरजूंना आर्थिक मदतही तो करतोय. कोरोना काळातही युवीने अनेकांसाठी मदतीचा हात पुढे केला. कोरोना काळात हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध होत नव्हते आणि युवीनं त्याच्या परीने काही हॉस्पिटन्सना बेड्स दिले.
आता कोरोनाची चौथी लाट येण्याची चर्चा सुरू आहे. अशात युवराज सिंगच्या YouWeCan या संस्थेनं पुन्हा पुढाकार घेतला आहे. युवीच्या सांगण्यावरून YouWeCan संस्थेनं गुरू गोविंद सिंह वैद्यकिय महाविद्यालय, फरीदकोट या हॉस्पिटल्सला १२० कर्टिकल केयर यूनिट बेड्स दिले आहेत. यासह संस्थेने असे १०० बेड्स लावण्याचा निर्धार केला आहे.