फलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या चौथ्या कसोटीत भारत-ऑस्ट्रेलिया लढत अखेर अनिर्णीत राहिली. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी बाजी मारताना सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर चषकावर नाव कोरले. त्याचबरोबर, भारताने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली.
ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या डावात ५७१ धावा करत ९१ धावांची आघाडी घेतली. यानंतर पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अपेक्षित वर्चस्व राखताना सामना अनिर्णीत राखला. दोन्ही कर्णधारांनी सामना अनिर्णीत राखण्याचे मान्य केले तेव्हा ऑस्ट्रेलियाने ७८.१ षटकांत २ बाद १७५ धावा केल्या होत्या. नाइट वॉचमन म्हणून सलामीला आलेला मॅथ्यू कुहनेमन (६) याला बाद करत भारतीयांनी कांगारूंना लवकर धक्का दिला. मात्र, यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी २९२ चेंडूंत १३९ धावांची भागिदारी केली.
चौथ्या कसोटीत दीर्घ कालावधीनंतर कसोटी झळकावलेला विराट कोहली सामनावीर ठरला. तसेच, संपूर्ण मालिकेत कांगारुंना आपल्या फिरकीवर नाचवलेल्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी संयुक्तपणे मालिकावीर पुरस्कार मिळविला. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत, दोघांनी मिळून एकुण ४७ विकेट्स घेतल्या, ज्याचा आनंद दोघांनी एक व्हिडिओ शेअर करून साजरा केला.
अश्विनने इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये दोन्ही बॉलीवूड अभिनेता अक्षर कुमारच्या रावडी राठोड या चित्रपटातील संवाद बोलताना दिसत आहेत. ज्यामध्ये जडेजा आणि अश्विन एक तेरा आणि एक मेरा डायलॉग बोलून ऑस्ट्रेलियाची विकेट एकमेकांसोबत शेअर करत आहेत.
कुहनेमनने डीआरएस घेतला असता तर....
पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात नाइट वॉचमन मॅथ्यू कुहनेमन याच्या रूपाने भारताला एकमेव बळी मिळाला. तो ११व्या षटकात अश्विनविरुद्ध पायचीत झाला. यावेळी, त्याला दुसऱ्या टोकावर उभा असलेल्या हेडने डीआरएस घेण्यास मनाई केली. मात्र, नंतर टीव्ही रिप्लेमध्ये कुहनेमन नाबाद असल्याचे स्पष्ट झाले.
सूर्याने बदलला मूड
धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी ४१व्या षटकात बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला. त्यावेळी, त्याने आपल्या सहकाच्यांशी संवाद साधताना भारतीय संघ डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरल्याची बातमी दिली. सूर्याने दिलेल्या या बातमीनंतर भारतीय खेळाडूंनीही मैदानावरच काही वेळ जल्लोष केला.
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव ) : १६७.२ षटकांत सर्वबाद ४८० धावा भारत (पहिला डाव ) : १७८.१ षटकांत सर्वबाद ५७१ धावाऑस्ट्रेलिया (दुसरा डाव : मॅथ्यू कुहनेमन पायचीत गो. अश्विन ६, ट्रैविस हेड त्रि. गो. अक्षर ९०, मार्नस लाबुशेन नाबाद ६३, स्टीव्ह स्मिथ नाबाद १०. अवांतर - ६. एकूण : ७८.१ षटकांत २ बाद १७५ धावा घोषित. बाद क्रम : १-१४, २- १५३. गोलंदाजी रविचंद्रन अश्विन २४-९-५८- १ रवींद्र जडेजा २०-७-३४-०; मोहम्मद शमी ८-१-१९-०: अक्षर पटेल १९-८-३६-१, उमेश यादव ५-०-२१-०: शुभमन गिल १.१०-१-०; चेतेश्वर पुजारा १-०-१-०.