वॉर्सेस्टर : सलग दोन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघावर इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप टाळण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचप्रमाणे, उपकर्णधार हरमनप्रीत कौर आणि आघाडीची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यांना खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करावा लागत असल्याने शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात त्यांना आपली कामगिरी उंचवावीच लागेल.
मिताली राजच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला गेल्या सात एकदिवसीय सामन्यांपैकी सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही एकतर्फी हार पत्करण्याचे संकट भारतीय संघावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी बऱ्यापैकी सुधारणा करताना एकवेळ भारताच्या विजयाचा मार्ग तयार केला होता. मात्र, त्याचवेळी फलंदाजांकडून मात्र कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. एकटी मिताली सोडली, तर कोणालाही आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.
उपकर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक निराशा केली आहे. २०१७ साली विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या १७१ धावांच्या धमाकेदार खेळीनंतर तिला केवळ दोनच सामन्यांत अर्धशतक झळकावता आलेले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), स्मती मानधना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, स्रेह राणा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्स, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, एकता बिष्ट, राधा यादव, पूनम यादव, प्रिया पूनिया आणि इंद्राणी रॉय.
इंग्लंड : हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, केट क्रॉस, नॅट साइवर, सोफिया डंकले, लॉरेन विनफील्ड-हिल, अन्या श्रुबसोल, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, एमी जोन्स, फ्रेया डेविस, टॅश फारंट, सराह ग्लेन, मैडी विलियर्स, फ्रैन विल्सन, सारा ग्लेन आणि एमिली अरलॉट.
सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)
Web Title: Crisis of clean sweep on Indians, third ODI today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.