किंग्स्टन : ‘ख्रिस गेल याने काही दिवसांपूर्वीच रामनरेश सारवान याच्यावर टीका केली होती. यासाठी त्याला शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती क्रिकेट वेस्ट इंडिजचे (सीडब्ल्यूआय) प्रमुख रिकी स्किरिट यांनी दिली. त्याच वेळी, ‘यामुळे गेलची शानदार कारकीर्द संपुष्टात येणार नाही,’ असा विश्वासही स्किरिट यांनी व्यक्त केला आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) सेंट ल्युसिया फ्रेंचाइजीने गेलला २०२० सत्रासाठी करारबद्ध केले आहे. मात्र याआधी तो जमैका तलावाहज संघाकडून खेळत होता. सारवानमुळेच जमैका संघाने मला बाहेरचा रस्ता दाखवला, असा आरोप गेलने केला होता. तसेच, सारवान कोरोना विषाणूपेक्षाही अधिक वाईट असल्याचे वक्तव्य गेलने केले होते.
यावर स्किरिट यांनी सांगितले की, ‘हा वैयक्तिक वाद आहे, पण हा वाद लवकर संपेल असे दिसत नाही. गेल आणि सीपीएलमध्ये सध्या कशी चर्चा सुरू आहे याची मला कल्पना आहे. कारण सीपीएलचे काही नियम आहेत, जे येथे लागू होतील. कारण गेल एका फ्रेंचाइजी संघाशी करारबद्ध आहे.’
गेलच्या कारकिर्दीविषयी स्किरिट म्हणाले की, ‘मला विश्वास आहे की हा वाद जागतिक मुद्दा नाही बनणार. कारण त्याची कारकीर्द शानदार राहिली आहे आणि या घटनेमुळे त्याची कारकीर्द संपुष्टात यावी अशी माझी इच्छा नाही.’ (वृत्तसंस्था)
ख्रिस गेलने आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितले होते की, ‘सारवान, सध्या तू कोरोना विषाणूपेक्षाही अधिक वाईट आहेस. तलावाहजसोबत जे काही झाले, त्यात तू महत्त्वाची भूमिका निभावलीस. कारण तुझे आणि संघ मालकाचे चांगले संबंध आहेत.’
Web Title: Criticism of Sarwan could cost Gayle dearly, Cricket West Indies chief made clear
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.