ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटी आजपासून सुरु झाली. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला. केन विलियम्सनला दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घ्यावी लागली आणि त्याच्याजागी कर्णधारपद टॉम लॅथमकडे सोपवण्यात आले. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑसी सलामीवीर जो बर्न्स लगेच माघारी परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुश्चॅग्नेनं कांगारूंचा डाव सावरला. ही जोडी तुटल्यानंतर मैदानावर आलेला स्टीव्ह स्मिथच्या पहिल्या धावेनं चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. कारण जाणून तुम्हालाही असाच जल्लोष करावासा वाटेल.
वॉर्नर आणि बर्न्स या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. कॉलीन डी ग्रँडहोमनं ऑसींना पहिला धक्का दिला. त्यानं बर्न्सला 18 धावांवर माघारी पाठवले. वॉर्नर आणि लॅबुश्चॅग्ने या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. नील वॅगनरनं ऑसींचा दुसरा फलंदाज माघारी पाठवला. वॉर्नर 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर स्मिथ आणि लॅबुश्चॅग्ने यांनी दमदार खेळ केला. लॅबुश्चॅग्नेनं 2019मधील आपला फॉर्म 2020मध्येही कायम राखताना अर्धशतकी खेळी केली.
पण, लॅबुश्चॅग्नेच्या या अर्धशतकापेक्षा स्मिथची एक धाव चाहत्यांच्या जल्लोषासाठी कारणीभूत ठरली. स्मिथला पहिली धाव घेण्यासाठी तब्बत 39 चेंडूंचा सामना करावा लागला. 39व्या चेंडूवर जेव्हा स्मिथनं पहिली धाव घेतली तेव्हा स्टेडियवर एकच जल्लोष झाला.
पाहा व्हिडीओ..