नवी दिल्ली : आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेत देखील टी-२० लीगचा थरार रंगणार आहे. यासाठी आयपीएलमधील (IPL) काही फ्रँचायझींनी संघ खरेदी केले असून यातील खेळाडूंच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) आयोजित केलेल्या टी-२० लीगमध्ये फाफ डुप्लेसीसला (Faf Du Plessis) मोठी जबाबदारी मिळाली आहे. जोहान्सबर्ग सुपर किंग्सच्या (Johannesburg Super Kings) संघाने डुप्लेसीसकडे आपल्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. या संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्ज स्पोर्ट्स लिमिटेडकडे असून आयपीएलमध्ये खेळणारी चेन्नई सुपर किंग्जही त्याचाच संघ आहे. IPL च्या मागील हंगामाच्या लिलावापूर्वी चेन्नईच्या संघाने डुप्लेसीसला रिलीज केले होते. यानंतर त्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागली होती.
क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, डुप्लेसीस व्यतिरिक्त मोईन अलीला (Moeen Ali) देखील संघात स्थान मिळाले आहे. अलीला जवळपास ३.१८ कोटी रूपयांमध्ये खरेदी करण्यात आले आहे. तर डुप्लेसीससाठी फ्रॅंचायझीने जवळपास ३ कोटी रूपये मोजले आहेत. याशिवाय श्रीलंकेचा फिरकीपटू महीश तीक्ष्णाला १.५९ कोटी आणि वेस्टइंडिजच्या रोमारियो शेफर्डला १.३९ कोटीमध्ये खरेदी केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जेला जवळपास ४० लाख देऊन खरेदी केले आहे.
फ्लेमिंग यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा जोहान्सबर्ग सुपरकिंग्सने न्यूझीलंडच्या संघाचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांना आपल्या संघाचे प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. फ्लेमिंग मागील मोठ्या कालावधीपासून चेन्नईच्या संघाचा हिस्सा राहिले आहेत. तर ३८ वर्षीय डुप्लेसीसकडे मोठा अनुभव असून त्याचा संघाला फायदा होईल असे संघाकडून सांगितले जात आहे. टी-२० क्रिकेट मधील २९७ सामन्यांमध्ये डुप्सेसिसने ७,६८८ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतके आणि ४९ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. तसेच आयपीएलमध्ये सीएसकेसाठी त्याने १०० सामने खेळले आहेत.