Join us

CSK चा गोलंदाज मथीशा पथिराणा बनला करोडपती! 'या' फ्रँचायझीने मोजली सर्वाधिक रक्कम

वा गोलंदाज मथीशा पथिराणाच्या गोलंदाजीने IPL 2024 मध्ये प्रभावित केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी त्याची श्रीलंकेच्या संघातही निवड झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:02 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये यशस्वी संघाची चर्चा होते, तेव्हा चेन्नई सुपर किंग्स हे नाव नेहमी आघाडीवर पाहायला मिळाले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने पाच जेतेपदं नावावर केली आहेत आणि अनेक युवा खेळाडूही घडवले आहेत. चेन्नईला यंदाच्या पर्वात साखळी सामन्यात गाशा गुंडाळावा लागला असला तरी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील त्यांची नवी सुरुवात ही चांगली झाली. युवा गोलंदाज मथीशा पथिराणा ( Matheesha Pathirana ) याच्या गोलंदाजीने यंदाही प्रभावित केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी त्याची श्रीलंकेच्या संघातही निवड झाली आणि त्यासाठीच त्याला आयपीएल २०२४ मधून लवकर मायदेशात परतावे लागले. 

पथिराणाने आयपीएल २०२४ मध्ये ६ सामन्यांत CSK साठी १३ विकेट्स घेतल्या. २०२२ मध्ये १९ वर्षीय पथिराणाला चेन्नईने २० लाखांत करारबद्ध केले आणि आतापर्यंत २० सामन्यांत त्याने ३४ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या गोलंदाजीच्या शैलीशी मिळतीजुळती शैल पथिराणाची आहे आणि डेथ ओव्हरमध्ये CSK ने त्याचा चांगला वापर करून घेतला. २०२३ च्या चेन्नई सुपर किंग्सच्या जेतेपदात पथिराणाचा ( १९ विकेट्स) महत्त्वाचा वाटा होता. श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघात ( २०२० व २०२२) त्याने प्रतिनिधीत्व केले होते.

आयपीएलमधील त्याची कामगिरी पाहता लंका प्रीमिअऱ लीग २०२४ ( Lanka Premier League 2024 Auction) त्याच्यासाठी मोठी बोली लागली आहे. पथिराणाला कोलंबो स्ट्रायकर्स ( Colombo Strikers ) संघाने सर्वाधिक १ कोटींची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले आहे. लंका प्रीमिअर लीगच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या ऑक्शनसाठी ४२० खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आणि त्यात १५४ लंकन खेळाडूंचा समावेश होता. 

मथीशा पथिराणाने १२ वन डे व ६ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत अनुक्रमे १७ व ११ विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटश्रीलंकाचेन्नई सुपर किंग्स