चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी खेळाडूंना रिटेन-रिलीज करण्याआधीच एमस धोनी आगामी हंगामातही संघाकडून खेळताना दिसेल याचे संकेत दिले होते. अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात धोनीला संघात कायम ठेवत, CSK च्या संघानं लाखो चाहत्यांच्या मनासारखा निर्णय घेतला. आता CSK फ्रँचायझी मालक आणि सीईओ विश्वनाथन यांनी महेंद्रसिंह धोनी कोणत्या मैदानात अखेरचा सामना खेळणार त्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
CSK नं ४ कोटीसह धोनीला केलं कायम
आयपीएल स्पर्धा संपली की, धोनी थांबणार का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. २०२४ च्या हंगामानंतरही ही चर्चा रंगली. पण CSK च्या संघानं ४ कोटी रुपयांमध्ये धोनीला संघासोबत कायम ठेवत त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीच्या चर्चेला पूर्ण विराम दिला. आता काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या अखेरच्या सामन्यासंदर्भात भाष्य केले आहे.
तो कुणालाच काही कळू देत नाही, पण..
महेंद्रसिंह धोनी हा आश्चर्यकारक निर्णय घेण्यात माहिर आहे. काशी विश्वनाथन यांनी त्याच्या याच स्वभावाचा दाखला देत तो शेवटचा सामना कुठं खेळणार हे ठरलंय असं सांगितले. ते म्हणाले की, धोनी आपल्या निर्णयासंदर्भात कधीच कुणाला काही कळू देत नाही. पण आयपीएलमधील शेवटचा सामना चेन्नईच्या मैदानात खेळण्याची त्याची इच्छा आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील माजी खेळाडू अंबाती रायडूसोबत खास मुलाखतीमध्ये काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या ठरलेल्या प्लानिंगवर भाष्य केले आहे.
धोनीला खेळायचं तेवढं खेळू देत!
CSK च्या चाहत्यांप्रमाणेच सीईओ देखील धोनीनं फक्त खेळत राहावे, अशी भावना व्यक्त केली. जोपर्यंत त्याला खेळायचं आहे तोपर्यंत चेन्नई सुपर किंग्सचे दरवाजे त्याच्यासाठी खुले असतील. कधी थांबायचं यासंदर्भात धोनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
CSK नं धोनीसह ५ खेळाडूंना केलं रिटेन
महेंद्रसिंह धोनी हा २००८ पासून चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसते. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. कॅप्टन्सी सोडल्यावर तो ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसत आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्सनं ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), रवींद्र जडेजा (१८ कोटी), मथीसा पथिराना (१३ कोटी), आणि शिवम दुबे (१२ कोटी) या खेळाडूंना रिटेन केले असून त्यांच्या पर्समध्ये आता ५५ कोटी शिल्लक आहेत.