इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान साखळी फेरीच संपुष्टात आलं. गतविजेत्या CSK ला साखळी फेरीतील शेवटच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाहेरचा रस्त दाखवला. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीचाही ( MS Dhoni) या आयपीएलमधील प्रवास इथेच संपला. आता धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार की नाही? मेगा ऑक्शनपूर्वी तो त्याचा निवृत्तीचा निर्णय जाहीर करतोय का? असे अनेक प्रश्न सुरू झाले आहेत. पुढच्या वर्षी खेळायचे की नाही, याबाबतच्या निर्णयाचा धोनीने आधीच सुरू केला असावा आणि फ्रँचायझीनेही याबाबत मोठे अपडेट्स दिले आहेत.
२००८ पासून धोनी चेन्नई सुपर किंग्स ( मधली दोन वर्षे बंदीची सोडल्यास) सोबत आहे. त्याने याही पर्वात २२०.५५ च्या स्ट्राईक रेटने १६१ धावा चोपल्या. ८ सामन्यांत त्याला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याची सरासरी ही ५३.६७ इतकी राहिली आहे. धोनीने आयपीएल कारकीर्दित २६४ सामन्यांत ५२४३ धावा केल्या आहेत. ४२ वर्षीय धोनीच्या निवृत्तीची चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहेत, परंतु त्याने प्रत्येकवेळी या चर्चांना चकवा दिला. यंदाचे पर्व सुरू होण्यापूर्वी CSK ने नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. त्यामुळे यंदा धोनी निवृत्ती घेईलच अशी दाट शक्यता वर्तवली गेली. त्यामुळेच चेपॉकवरील शेवटच्या साखळी सामन्यात सर्वच भावूक दिसले. फ्रँचायझीनेही चाहत्यांना सामना संपल्यानंतर कुठे जाऊ नका असे आवाहन केले आणि धोनी निवृत्ती जाहीर करतोय का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आला. पण, चाहत्यांचे आभार मानण्यासाठी फ्रँचायझीने हे आवाहन केले होते.
आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे आणि फ्रँचायझी अनेक खेळाडूंना रिलीज करणार आहेत. त्यामुळे धोनी जर खेळत असेल तर CSK त्याला रिटेन नक्की करतील. पण, ४३ वर्षीय धोनीला रिटेन करायचं का? याबाबतचा मोठा निर्णय फ्रँचायझीला घ्यावा लागणार हे निश्चित. कारण, तसं केल्यास त्यांच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. धोनीच्या निवृत्तीबाबत CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, आम्ही धोनीच्या भविष्यात खेळण्याबाबत कोणतीच चर्चा केलेली नाही. माजी कर्णधाराच्या निर्णयामध्ये फ्रँचायझी हस्तक्षेप करू इच्छित नाही. तो त्याचा निर्णय असेल तो आम्हाला सांगेल आणि आम्ही त्याबाबत त्याला विचारणार नाही.