मुंबई : चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघासाठी यंदाचे Indian Premier League (IPL 2020) सत्र अत्यंत निराशाजनक ठरले आहे. आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या दहा सामन्यांतून केवळ तीन सामनेच त्यांना जिंकता आलेले आहेत. त्यामुळेच त्यांचे आव्हान आता संपल्यात जमा झाले आहे. क्रिकेटचाहत्यांनाही आता सीएसकेकडून फार अपेक्षा नाहीत. मात्र, असे असले तरी भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याला मात्र सीएसकेच्या पुनरागमनाची आशा दिसत आहे. त्याने तशी प्रतिक्रियाही दिली असून, सीएसके कशा प्रकारे पुनरागमन करेल हेही सांगितले आहे.
सीएसकेच्या पुनरागमनाबाबत पठाण म्हणाला की, ‘कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे असा संघ आहे, जो अजूनही पुनरागमन करु शकतो. जर कोणता संघ सातव्या-आठव्या क्रमांकावरुन पुनरागमन करु शकतो, तर तो संघ सीएसके आहे. खेळाडूंना कशाप्रकारे हाताळावे, हे सीएसकेला माहित आहे. मी स्वत: त्या संघाकडून २०१५ साली खेळलो आहे, त्यांच्यासाठी खेळाडू अत्यंत महत्त्वाचे आहेत.’इरफानने पुढे म्हटले की, ‘या फ्रेंचाईजीला २१-२२ वर्षांपासून क्रिकेट हाताळता येते. चेन्नई लीगमध्येही ही फ्रेंचाईजी आपला संघ अशाप्रकारे हाताळतात. ते खेळाडूंना कायम पाठिंबा देतात आणि तुम्ही फक्त खेळा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असा विश्वास देतात.’
यंदा सीएसके अकराव्यांदा आयपीएलमध्ये खेळत आहेत. जर का सीएसकेला प्ले ऑफ गाठण्यासाठी यश आले नाही, तर स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच सीएसके प्ले ऑफपासून दूर राहील. काही अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीचाही सीएसकेवर परिणाम झाल्याचे इरफानने सांगितले. तो म्हणाला की, ‘स्पर्धेच्या इतिहासात सीएसकेची कामगिरी शानदार ठरली आहे. यंदा हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्या अनुपस्थितीचाही परिणाम झाला आहे. याशिवाय काही खेळाडूही दुखापतग्रस्त झाले. मात्र अजूनही सीएसकेच्या पुनरागमनाबाबत आम्हाला आशा वाटते, कारण त्यांच्याकडे धोनीसारखा कर्णधार आहे. तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघातून बाहेर काढू शकतो.’