Ravindra Jadeja CSK, IPL 2022: यंदाचा हंगाम स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजासाठी खूप वाईट सुरू आहे. त्याने या मोसमाची सुरूवात चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार म्हणून केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ८ पैकी ६ सामने गमावले. त्याचबरोबर जडेजाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीवरही कर्णधारपदाच्या जबाबदारीचे दडपण दिसून आले. त्यामुळे त्याचा फॉर्म परतलाच नाही. या साऱ्या गोंधळात जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि धोनीला जबाबदारी परत दिली. यानंतरही त्याला फॉर्मात परतता आलेलं नाही. असं असलं तरी, काळजीचं कारण नाही, असं विधान CSKचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने केले.
रविंद्र जाडेजाने कर्णधारपद सोडल्यानंतर दोन सामने खेळले. पहिल्या सामन्यात CSKच्या संघाने २०० पार मजल मारली. तो सामनादेखील चेन्नईने जिंकला. पण संघाच्या विजयात जाडेजाचा फारसा वाटा नव्हता. त्यानंतर बुधवारी CSK ला RCB विरूद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. दोनही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला. आता त्याच्या खराब फॉर्मवर चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचे मोठे विधान समोर आले आहे. जडेजाच्या फॉर्मची आपल्याला अजिबात चिंता नसल्याचे फ्लेमिंगने सांगितले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) चेन्नई संघाचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर जाडेजाच्या फॉर्मवर फ्लेमिंग म्हणाला, "मला अजिबात काळजी नाही. टी२० हा खेळ कठीण असतो. जेव्हा तुम्ही पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो, तेव्हा तुम्हाला तुमचा वेग किंवा लय पकडण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. या बाबतीत अजून सुधारणा करण्याची गरज आहे. बॅटिंग ऑर्डर काय असू शकते ते आम्ही पाहू, पण मला अजूनही त्याच्या खराब फॉर्मची चिंता नाही."
दरम्यान, रविंद्र जाडेजाने गेल्या ५ सामन्यात ५० धावा केल्या आणि त्याला फक्त एकच विकेट घेता आली. कर्णधारपद सोडल्यानंतर झालेल्या दोन सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर यात जडेजाने केवळ ४ धावा केल्या आणि तो एकही विकेट घेऊ शकला नाही.