इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज आणि 10 स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे चेन्नईच्या सर्व खेळाडूंना पुन्हा क्वारंटाईन करावं लागलं. चेन्नईला धक्का देणाऱ्या या बातमीनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात विमानतळावर चेन्नईचे खेळाडू एका अनोळखी व्यक्तीला मिठी मारताना दिसत आहेत. त्यामुळे ही झप्पी चेन्नईला महागात पडली, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल ) 13वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीय येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संघ एक महिना आधीच येथे दाखल झाले आणि 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून अनेक संघाचे खेळाडू सरावासाठी मैदानावरही उतरले. पण, चेन्नईचा संघ अजूनही क्वारंटाईनमध्ये आहे.
चेन्नईचा गोलंदाज दीपक चहर याला कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे. ''चहरला आता 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर त्याची चाचणी केली जाईल आणि 24 तासांत दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला मैदानावर उतरण्याची संधी मिळेल,''असे CSKच्या सूत्रांनी सांगितले.