IPL 2021: आयपीएलच्या इतिहासात आजवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं (RCB) एकदाही जेतेपद प्राप्त केलेलं नसलं तरी संघाच्या चाहत्यांमधला उत्साह आजवर कधीच कमी झालेला नाही. दरवर्षी आरसीबीचे चाहते आपल्या संघाच्या जेतेपदासाठी उत्सुक असतात. नव्या जोशात आणि उत्साहात दरवर्षी आरसीबीचे चाहते संघाला प्रोत्साहन देताना दिसतात. मग ते बंगलोर असो मुंबई असो किंवा मग दुबईचं स्टेडियम आरसीबीचे चाहते सर्वच ठिकाणी आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जुन हजेरी लावत असतात. पण यावेळी एक फॅन चक्क तक्रार घेऊन स्टेडियममध्ये पोहोचला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या यंदाच्या सीझनचा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळविण्यात येत आहे. यावेळी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये पोहोचत आहेत. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात लढत झाली. पण या सामन्यात एक हटके चाहता पाहायला मिळाला की जो आपल्या पत्नीची तक्रार घेऊन आला होता.
स्टेडियममध्ये उपस्थितीत प्रेक्षकांमध्ये एका चाहत्यानं कॅमेराचं लक्ष वेधून घेतलं होतं. या प्रेक्षकाच्या हातात एक पोस्टर होतं आणि त्यावर त्यानं आपली तक्रार नमूद केली होती. "माझी पत्नी मला चेन्नई सुपरकिंग्जची जर्सी परिधान करू देत नाही", असं त्यानं पोस्टरवर लिहिलं होतं. संबंधित प्रेक्षक हा चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा चाहता असून त्याची पत्नी मात्र कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची फॅन आहे. त्यामुळे त्याला आपल्या पत्नीची मर्जी राखण्यासाठी बंगलोरची जर्सी परिधान करावी लागतेय असं प्रांजळ तक्रार त्यानं पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केली. या प्रेक्षकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं आणि त्यावर एकच हास्यकल्लोळ देखील झाला.
चेन्नई सुपर किंग्ज संघानं देखील याची दखल घेत आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चाहत्याचा फोटो ट्विट केला आहे. प्रेम हे आंधळं असतं असं कॅप्शन देत त्यानं सीएसके प्रती असलेलं चाहत्यांचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चेन्नईनं जिंकला सामना!आरसीबी विरुद्धचा सामना चेन्नईनं ६ विकेट्सनं जिंकला. या विजयानंतर सीएसकेचे चाहते प्रचंड खूष झाले. यात पत्नीची तक्रार करणाऱ्या या चाहत्यानंही जल्लोष केला. आरसीबीची जर्सी परिधान केली असली तरी आपण सीएसकेचे फॅन आहोत हे त्यानं यातून दाखवून दिलं.
सीएसकेचे सलामीवीर ऋतूराज गायकडवाड(३८) आणि फॅफ ड्यूप्लेसिसच्या (३१) शानदार अर्धशतकीय भागीदारीच्या जोरावर सीएसकेनं आरसीबी विरुद्धचा सामना जिंकला. तर सीएसकेकडून तीन विकेट्स घेत आरसीबीला लगाम घातला होता. आरसीबीनं ६ विकेट्सच्या मोबदल्यात सीएसकेसमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. सीएसकेनं ते ११ चेंडू राखून गाठलं. आरसीबी विरुद्धच्या विजयानंतर सीएसकेचा संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला.