Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) शनिवारी CSKला पराभवाचा धक्का देताना अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करताना Play Off मधील स्थान जवळपास पक्के केले आहे. तेच दुसरीकडे CSKला आता उर्वरित पाचही सामने जिंकून अन्य संघांच्या नेट रनरेटवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. चेन्नईला आजचा पराभव खूपच महागात पडणार आहे. शिखर धवननं ( Shikhar Dhawan) एकहाती दिल्लीला विजय मिळवून दिला. धवननं ट्वेंटी-20तील पहिले शतक झळकावले आणि दिल्लीला पुन्हा अव्वल स्थान पटकावून दिले.
करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSKला धक्का दिला. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी CSKला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. नॉर्ट्झेनं ३६ धावा करणाऱ्या वॉटसनला बाद केले. कागिसो रबाडानं १५ व्या षटकात फॅफला बाद केले.
फॅफनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर आलेला धोनी ( ३) धावांवर माघारी परतला, परंतु रायुडू व जडेजा यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेताना पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रायुडू २५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४५, तर जडेजा १३ चेंडूंत ४ षटकारांसह ३३ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं ४ बाद १७९ धावा केल्या. अॅनरिच नॉर्ट्झेनं दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात DCची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अजिंक्य रहाणे ( ८) पुन्हा एकदा अपयशी ठरला, चहरनं त्यालाही माघारी पाठवले. शिखर धवनचे सोडलेले दोन झेल चेन्नई सुपर किंग्सला महागात पडले. शिखर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली. ड्वेन ब्राव्होनं ही ६८ धावांची भागीदारी अय्यरला ( २३) बाद करुन संपुष्टात आणली. पण, धवन एका बाजूनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत होता.
मार्कस स्टॉयनिसनं वाहत्या गंगेत हात धुतले. नशीबानंही धवनला साथ दिली. त्याचे तीन झेल चेन्नईच्या क्षेत्ररक्षकाकडून सुटले. स्टॉयनिस २४ धावांवर माघारी परतला. अॅलेक्स कैरीही ४ धावांवर झेलबाद झाला. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना अक्षर पटेलनं तीन खणखणीत षटकार खेचले आणि दिल्लीचा विजय पक्का केला. दिल्लीनं ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. धवन ५८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०१ धावांवर नाबाद राहिला, तर पटेलनं ५ चेंडूंत ३ षटकार खेचून २१ धावा केल्या.
Web Title: CSK vs DC Latest News : Delhi Capitals win by 5 wickets against Chennai Super Kings, Shikhar Dhawan century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.