ipl 2022: आजपासून 'दस का दम'; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार

धोनी आणि जडेजाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 10:16 AM2022-03-26T10:16:04+5:302022-03-26T10:16:55+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs KKR: Captains Ravindra Jadeja and Shreyas Iyer in spotlight as IPL 2022 marks beginning of a new dawn | ipl 2022: आजपासून 'दस का दम'; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार

ipl 2022: आजपासून 'दस का दम'; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ताणून धरलेल्या आयपीएलच्या १५व्या सत्राला शनिवारपासून सुरुवात होईल. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या लढतीने यंदाच्या आयपीएलचे बिगुल वाजेल. यावेळी सर्वांचे लक्ष असेल ते महेंद्रसिंग धोनीवर. गुरुवारीच त्याने धक्कादायक निर्णय घेताना सीएसके संघाचे कर्णधारपद सोडले आणि संघाची धुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपविली. त्यामुळे धोनी आणि जडेजाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

यंदा विजेतेपदासाठी दहा संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या नव्या संघाच्या कामगिरीची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच भारतात प्रेक्षकांच्या उपस्थितीत आयपीएल सामने रंगणार असल्याने यंदाच्या सत्राला विशेष महत्त्व आले आहे. गेल्यावर्षी आयपीएलचे पहिले सत्र भारतात आयोजित झाले खरे, पण त्यावेळी प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी नव्हती. तसेच स्पर्धा मध्यावर आली असताना कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएल स्थगित करण्याची वेळ आली. यानंतर स्पर्धेचे दुसरे सत्र यूएईमध्ये आयोजित झाले.

यावेळी, २५ टक्के प्रेक्षकांच्या प्रवेशास परवानगी मिळाल्याने खेळाडूंमध्येही उत्साह संचारला आहे. दोन नव्या संघांच्या समावेशाने यंदा साखळी सामन्यांची संख्याही वाढली आहे. यंदा ६० साखळी सामन्यांऐवजी ७४ सामने रंगतील. त्यामुळे यंदाची आयपीएल दोन महिन्यांहून अधिक काळ रंगेल.
गेल्यावेळची ठेच आहे लक्षात!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २०२१ च्या आयपीएल-दरम्यान कोरोनाचा मोठा फटका बसला होता. खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर सत्र मध्यावर स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित सामने यूएईमध्ये खेळविण्यात आले. हा अनुभव लक्षात घेऊन बीसीसीआयने यंदा सर्व साखळी सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे खेळविण्याचे निश्चित केले. खेळाडूंना कमीत कमी प्रवास करता येईल, यासाठी निर्णय घेण्यात आला.

धावांचा पडणार पाऊस
यंदा ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. यामुळे आयपीएलमध्ये छाप पाडून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आणि भक्कम करण्यासाठी सर्वांचाच प्रयत्न असेल. खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे, याचा फायदा घेत फलंदाज चौफेर फटकेबाजी करून धावांचा पाऊस पाडतील. त्याचवेळी पुढील दोन महिने 'स्पोर्टिंग पीच' तयार करण्याचे आव्हानही क्युरेटर्सपुढे राहील.

लक्ष धोनीकडे
यंदाचे सत्र महेंद्रसिंग धोनीचे अखेरचे सत्र ठरेल, अशी चर्चा रंगत आहे. त्याने ऐनवेळी संघाची धुरा जडेजाकडे सोपविल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले. विशेष म्हणजे जडेजाने देशांतर्गत स्पर्धेतही नेतृत्व केले नसल्याने त्याचे नेतृत्व कौशल्य पाहण्याची उत्सुकता लागली आहे. असे असले तरी यष्ट्यांमागे कायम सतर्क असलेल्या धोनीकडून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतच राहील, यात शंका नाही.

'मुंबईकर' श्रेयसला मिळणार फायदा?
गेल्यावेळचा उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स यंदा श्रेयस अय्यरच्या रूपाने नव्या कर्णधारासह मैदानात उतरेल. श्रेयस मूळचा मुंबईचा असल्याने त्याला वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी चांगल्याप्रकारे माहीत आहे. त्यामुळे खेळपट्टीनुसार अंतिम संघ निवडण्यात त्याला फारशी अडचण होणार नाही. श्रेयसने याआधी दिल्ली कॅपिटल्सचेही नेतृत्व केले. शिवाय नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेत श्रेयसने कमालीचे सातत्य राखले होते. टी-२० मालिकेत सलग तीन अर्धशतके ठोकून तो मालिकावीर ठरला होता.
 

Web Title: CSK vs KKR: Captains Ravindra Jadeja and Shreyas Iyer in spotlight as IPL 2022 marks beginning of a new dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.