Join us  

CSK vs KKR Latest News : कोलकाताने गमावलेला सामना खेचून आणला, CSKच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी मान टाकली

CSK vs KKR Latest News : केदार जाधव फलंदाजीला आला तेव्हा CSKला २१ चेंडूंत ३८ धावा हव्या होत्या, पण केदारनं १२ चेंडूंत ७ धावा केल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: October 07, 2020 11:33 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातल्या सामन्यात दम जाणवला नाही.  ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर यांची भन्नाट गोलंदाजी आणि रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी यांच्या अफलातून झेलनं KKRचे कंबरडे मोडले. शेन वॉटसनच्या अर्धशतकी खेळीनंतर CSK बाजी मारतील असाच अंदाज सर्वांनी बांधला होता. पण, CSKच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी मान टाकली अन् KKRनं गमावलेला सामना खेचून आणला. केदार जाधवने जेव्हा फटकेबाजीची गरज होती तेव्हा चेंडू रापले आणि त्यामुळे CSK वरील दडपण वाढले. KKRनं हा सामना जिंकून गुणतक्त्यात आगेकूच केली. 

KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात सुनीन नरीनच्या जागी राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. पण, त्रिपाठी वगळता KKRचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. शुबमन गिल ( ११),  इयॉन मॉर्गन (७), नितिश राणा ( ९), सुनील नरीन ( १७), आंद्रे रसेल ( २) आणि कार्तिक ( १२) यांना CSKच्या गोलंदाजांनी मोठी खेळी करूच दिली नाही. एकट्या राहुल त्रिपाठीनं KKRची खिंड लढवली. त्यानं ५१ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावा चोपल्या.  CSKकडून शार्दूल ठाकूर, सॅम कुरन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २, तर ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट्स घेतल्या. KKRला २० षटकांत सर्वबाद १६७ धावा करता आल्या. 

प्रत्युत्तरात CSKची सुरुवातही फार चांगली झाली नाही. फॅफ ड्यू प्लेसिस ( १७) चौथ्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध फॉर्मात परतलेल्या शेन वॉटसननं ( Shane Watson) KKRच्या गोलंदाजांचाही समाचार घेतला. त्यात अंबाती रायुडूनं दुसऱ्या विकेटसाठी उत्तम साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. कमलेश नागरकोटीनं १३व्या षटकात रायुडूला ( ३०) बाद केले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. वॉटसननं ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. IPL 2020 मधील हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक ठरले. सुनील नरीननं CSKला मोठा धक्का दिला. ४० चेंडूंत १ षटकार व ६ चौकार मारून ५० धावा करणाऱ्या वॉटसनला त्यानं माघारी पाठवलं.

वॉटसननंतर सर्व जबाबदारी धोनीवर होती, पण वरूण चक्रवर्थीनं त्याला ( ११) धावांवर त्रिफळाचीत केले. सॅम कुरनही ( १७) बाद झाल्यानं CSKच्या हातचा सामना निसटताना दिसला. केदार जाधवही चेंडू रापताना दिसला. त्यामुळे धावा व चेंडू यांच्यातील अंतर वाढत गेले आणि CSKला ५ बाद १५७ धावांवर समाधान मानावे लागले. KKRने १० धावांनी हा सामना जिंकला. 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स