Indian Premier League ( IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) ने हातचा सामना गमावला. विजयासाठी २१ चेंडूंत ३८ धावांची गरज असताना केदार जाधव खेळपट्टीवर आला. पण, त्याला फटके मारताच आले नाही. तो चेंडू रापताना दिसला. शेन वॉटसन, अंबाती रायुडू यांच्या उल्लेखनीय खेळीनंतर CSK सहज बाजी मारेल असेच वाटले होते. पण, कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders)ने जोरदार कमबॅक केले. त्यांच्या गोलंदाजांनी CSKच्या धावगतीवर लगामच लावला नाही, तर विकेट्सही काढल्या. KKRनं १० धावांनी हा सामना जिंकून गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावले.
KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात सुनीन नरीनच्या जागी राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. पण, त्रिपाठी वगळता KKRचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. शुबमन गिल ( ११), इयॉन मॉर्गन (७), नितिश राणा ( ९), सुनील नरीन ( १७), आंद्रे रसेल ( २) आणि कार्तिक ( १२) यांना CSKच्या गोलंदाजांनी मोठी खेळी करूच दिली नाही. एकट्या राहुल त्रिपाठीनं KKRची खिंड लढवली. त्यानं ५१ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावा चोपल्या. CSKकडून शार्दूल ठाकूर, सॅम कुरन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २, तर ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट्स घेतल्या. KKRला २० षटकांत सर्वबाद १६७ धावा करता आल्या.
प्रत्युत्तरात CSKची सुरुवातही फार चांगली झाली नाही. फॅफ ड्यू प्लेसिस ( १७) चौथ्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध फॉर्मात परतलेल्या शेन वॉटसननं ( Shane Watson) KKRच्या गोलंदाजांचाही समाचार घेतला. त्यात अंबाती रायुडूनं दुसऱ्या विकेटसाठी उत्तम साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. कमलेश नागरकोटीनं १३व्या षटकात रायुडूला ( ३०) बाद केले. सुनील नरीननं CSKला मोठा धक्का दिला. ४० चेंडूंत १ षटकार व ६ चौकार मारून ५० धावा करणाऱ्या वॉटसनला त्यानं माघारी पाठवलं. वॉटसननंतर सर्व जबाबदारी धोनीवर होती, पण वरूण चक्रवर्थीनं त्याला ( ११) धावांवर त्रिफळाचीत केले. सॅम कुरनही ( १७) बाद झाल्यानं CSKच्या हातचा सामना निसटताना दिसला. केदार जाधवही चेंडू रापताना दिसला. त्यामुळे धावा व चेंडू यांच्यातील अंतर वाढत गेले आणि CSKला ५ बाद १५७ धावांवर समाधान मानावे लागले. KKRने १० धावांनी हा सामना जिंकला.
KKRनं पहिल्या दहा षटकांत ९० धावा दिल्या, परंतु नंतरच्या १० षटकांत त्यांनी केवळ ६७ धावा देत सामन्याला कलाटणी दिली. पराभवानंतर धोनी म्हणाला,''सामन्यात एक टप्पा असा होता की त्यांनी दोन-तीन अप्रतिम षटकं टाकली. आम्हीही विकेट्स गमावल्या. त्या मधल्या षटकांत आमची फलंदाजी चांगली झाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता. गोलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, परंतु फलंदाजांनी त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकांत चौकारही मारता आले नाही. अशा परिस्थिती तुम्ही नाविण्यपूर्ण फटके मारायला शिकायला हवे.''