लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामना जोरदार पावसामुळे रद्द करण्यात आला. लखनौच्या डावातील अखेरच्या षटकात पावसाचे आगमन झाले. यानंतर पाऊस कायम राहिल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय झाला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. खेळ थांबला तेव्हा लखनौने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावा केल्या होत्या.
आयुषने एकाकी झुंज देत शानदार अर्धशतक झळकावत लखनौला समाधानकारक मजल मारुन दिली. त्याने निकोलस पूरनसोबत सहाव्या गड्यासाठी १४८ चेंडूंत ५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कृष्णप्पा गौतम बाद झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. चेन्नईकडून मोइन अली, मधीशा पथिराणा आणि महीश तीक्ष्णा यांनी दमदार गोलंदाजी करत लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
क्रिकेटप्रेमींना रविंद्र जडेजाच्या फिरकीची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. जाडेजानेही योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी करत लखनौचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसचा त्रिफळा उडवला. जडेजाने टाकलेला हा चेंडू इतका टर्न झाला की स्टॉयनिस एकदम चकित झाला. त्याचे हावभाव सर्वकाही सांगून गेले. तो इकडे-तिकडे पाहत राहिला. त्याला काही कळलेच नाही.
जडेजाच्या भेदक गोलंदाजीचा हा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडवर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, ७.२८ पर्यंत सामना सुरू न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जाणार होते आणि त्याआधी जर सामना सुरू झालाच तर तो ५-५ षटकांचा होणार होता. पण, सात वाजता पावसाचा अंदाज घेऊन ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले. गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि आजच्या सामन्यानंतर लखनौ व चेन्नई हे संघ प्रत्येकी ११ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे प्रत्येकी १० गुण असलेले संघ मागे गेले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: CSK Vs LSG: Ravindra Jadeja bowls a peach to get rid of Marcus Stoinis, Watch the Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.