आयपीएलमध्ये शनिवारी संध्याकाळी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्सवर सहज विजय मिळवला. या विजयाबरोबरच चेन्नईने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या सामन्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे आयपीएलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एकही विकेट न मिळवणाऱ्या गोलंदाजाला या सामन्यात दोन विकेट्स मिळाले. तत्पूर्वी यंदाच्या हंगामात झालेल्या आधीच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाची कामगिरी निराशाजनक झाली होती. नंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. गतवर्षी झालेल्या लिलावात या गोलंदाजाला चेन्नईनं १४ कोटी रुपये खर्चून खरेदी केले होते. त्याचं नाव आहे दीपक चहर.
गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये विकेट मिळवण्याची वाट पाहत असलेल्या दीपक चहरची प्रतीक्षा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संपली. चहरने जबरदस्त गोलंदाजी करताना ३ षटकांमध्ये १८ धावा देत २ विकेट्स टिपल्या. तत्पूर्वी दीपक चहरने २०२१ मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात एक विकेट टिपला होता.
दीपक चहरने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ९.५६ च्या सरासरीने २ विकेट्स मिळवसे आहेत. तर दीपक चहरने आयपीएलमधील आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीध्ये ६८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ६१ विकेट्स टिपले आहेत.२०२२ च्या लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्सने दीपक चहरला १४ कोटी रुपये मोजून संघात घेतले होते. मात्र २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बॅक इंजरीमुळे त्याला सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे तो २०२२ च्या संपूर्ण आयपीएलला मुकला होता. त्यानंतर २०२३ च्या आयपीएलसाठी चेन्नईने त्याल रिटेन केले. मात्र पुन्हा एकदा दुखापतीमुळे तो काही सामन्यांमधून संघाबाहेर गेला.