दुबई - आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात रंगलेल्या लढतीत चेन्नईने मुंबईवर २० धावांनी मात केली. या लढतीत खराब सुरुवातीनंतरही चेन्नईने मुंबईविरोधात ६ बाद १५६ अशी समाधानकारक धावसंख्या उभी केली. ऋतुराज गायकवाड याने नाबाद ८८ धावा फटकावल्या. यामध्ये त्याने ९ चौकार आणि चार षटकार हाणले. दरम्यान, खराब सुरुवातीनंतर चाचपडणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ससाठी अखेरचे १३ चेंडू निर्णायक ठरले.
मुंबईच्या वेगवान माऱ्याने आघाडीची फळी कापून काढल्यानंतर चेन्नईचा संघ एकवेळ १७.५ षटकांमध्ये पाच बाद १११ धावा, असा चाचपडत होता. त्यावेळी चेन्नईची मजल जेमतेम १३० धावांपर्यंत जाईल, असे वाटत होते. मात्र चेन्नईच्या डावातील अखेरच्या १३ चेंडूंनी सामन्याचे चित्रच पालटवून टाकले. या १३ चेंडूंमध्ये चेन्नईच्या फलंदाजांनी एकूण ४५ धावा फटकावल्या. त्यामधील सात चेंडूंमध्ये तर ३८ धावा कुटल्या गेल्या. यादम्यान, ५ षटकार आणि दोन चौकार ठोकले गेले.
१८ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ब्राव्होने मिल्नेच्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर १९ व्या षटकात ब्राव्होने ट्रेंट बोल्टला दोन षटकार, तर ऋतुराज गायकवा़ड याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यानंतर डावातील शेवटच्या षटकार ऋतुराजने जसप्रीत बुमराहला एक षटकार आणि एक चौकार ठोकला.
१५ व्या षटकानंतर चेन्नईचा संघ ४ बाद ८७ धावांवर अडखळला होता. त्यानंतर अखेरच्या ५ षटकांत चेन्नईने ६९ धावांची कुटाई केली. त्यामुळेच २० षटकांत १५० धावांची मजल मारणे चेन्नईला शक्य झाले. या विजयासह चेन्नईच्या खात्यात ८ सामन्यांमधून सहा विजयांसह १२ गुण जमा झाले आहेत. तर आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला आता किमान दोन विजयांची आवश्यकता आहे. तर मुंबईला पुढील सहा सामन्यांमधील चार सामने जिंकावे लागणार आहेत.
Web Title: CSK vs MI: That's where Mumbai indian's defeat was decided
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.