अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान ३ धावांनी नमवले. राजस्थानने ६ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वल स्थानी कब्जा केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर राजस्थानने २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या. त्यानंतर त्यांनी चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७२ धावांमध्ये रोखले. चेन्नईचा लोकल बॉय रविचंद्रन अश्विनचा अष्टपैलू खेळ सीएसकेला भारी पडला.
शेवटच्या दोन षटकांमध्ये ४० धावांची गरज असताना महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. दोघांनी सातव्या गड्यासाठी ३० चेंडूंत नाबाद ४९ धावांची वादळी भागीदारी केली. परंतु अखेरच्या षटकात २१ धावांची गरज असताना दोघांना १७ धावाच काढता आल्या. विशेष म्हणजे या निर्णायक षटकात वेगवान गोलंदाज संदीप शर्माने पहिले दोन चेंडू वाईड टाकले, परंतु त त्यानंतरही राजस्थानने विजयश्री खेचून आणली.
१ चेंडू ५ धावा, स्ट्राइकवर MS धोनी; अखेरच्या क्षणी संदीप शर्माचा तो निर्णय अन् राजस्थानचा विजय
राजस्थानविरुद्ध धोनीने चेन्नईचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळला. यासामन्यात देखील धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मैदानात उपस्थित असणाऱ्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. तसेच ऑनलाइन जिओ सिनेमावर पाहणाऱ्या प्रेक्षकांचा देखील धोनीच्या फलंदाजीला चांगला प्रतिसाद मिळाला. राजस्थान रॉयल्स मॅचच्या शेवटच्या षटकात जेव्हा तो आणि रवींद्र जडेजा फलंदाजी करत होते तेव्हा जिओ सिनेमावर दर्शकांची संख्या २.२ कोटींवर पोहोचली होती.
ही संख्या २०२३च्या आयपीएलमधील सर्वाधिक व्ह्यूवरशिप संख्या आहे.
चेन्नईकडून डीवोन कॉन्वे आणि अजिंक्य रहाणे यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी केली. मधली फळी अपयशी ठरल्याचा चेन्नईला फटका बसला, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी मोक्याच्यावेळी प्रत्येकी २ बळी घेतले. राजस्थानने आव्हानात्मक मजल मारली. सलामीवीर जोस बटलरने अर्धशतक झळकावल्यानंतरही राजस्थानला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे आणि आकाश सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत चेन्नईला वर्चस्व मिळवून दिले. बटलर-देवदत्त यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४१ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने नवव्या षटकात देवदत्त पडिक्कल व कर्णधार संजू सॅमसनलाही बाद केले. यानंतर बटलर, अश्विन, शिमरोन हेटमायर यांनी फटकेबाजी केली. अश्विन व हेटमायर यांची फटकेबाजी राजस्थान संघासाठी निर्णायक ठरली.