Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्ले ऑफमध्ये आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स आघाडीवर असले तरी अन्य संघांनाही समान संधी आहे. त्यामुळे या शर्यतीतून बाद होण्यासाठी एक पराभवही पुरेसा आहे. CSK vs RR या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) एक विक्रम नावावर केला. IPL मध्ये २०० सामना खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. या करो वा मरो सामन्यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानं धोनीला शुभेच्छा दिल्या.
CSK आणि RR यांना ९ सामन्यांत ३ विजय मिळवता आले आहेत आणि त्यांना ६ पराभव पत्करावे लागले आहेत. त्यांच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या वाट्यातील पाच सामने अजूनही शिल्लक आहेत. या दोघांनाही Play Offमध्ये प्रवेश करण्यासाठी पाचही सामने जिंकावे लागतील. तर त्यांना १० गुणांची कमाई करता येईल आणि आधीच्या ६ गुणांसह एकूण १६ गुणांची कमाई करून ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतील. पण, यापैकी केवळ एकच संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित करू शकतो. त्यामुळे चेन्नई - राजस्थान यांच्या सामन्यावर दोघांचेही भवितव्य अवलंबून आहे.
महेंद्रसिंग धोनी आज २००वा आयपीएल सामना खेळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळणारा धोनी हा पहिलाच खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावली आहेत.
सुरेश रैना म्हणाला,''IPL मध्ये २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू... महेंद्रसिंग धोनी भाई आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा. तुला सदैव यश मिळो. तू नेहमी आम्हाला अभिमान वाटेल अशीच कामगिरी केली आहेस.''