Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या शर्यतीतून बाद होण्यासाठी एक पराभवही पुरेसा आहे. CSK vs RR या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसले. पण, महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) त्याच्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करताना गोलंदाजांचा योग्य वापर करून घेतला. राजस्थान रॉयल्सचे ३ फलंदाज २८ धावांत माघारी परतले होते. त्यात धोनीनं घेतलेल्या सुपर डुपर कॅचनं गोलंदाज दीपक चहर यालाही अवाक् केले.
त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडूनं ( Ambati Rayudu) स्वतःचं नाव एका वेगळ्या पंक्तीत नोंदवले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा तो ११वा भारतीय फलंदाज ठरला. ९व्या षटकात श्रेयस गोपाळच्या पहिल्याच चेंडूवर कुरनचा झेल यष्टिरक्षक संजू सॅमसननं झेल सोडला. जीवदान मिळाल्यानंतर कूरन मोठी खेळी करेल असे वाटत होते, परंतु पुढच्याच चेंडूवर फटका मारण्याचा मोह तो आवरू शकला नाही. कुरन ( २२) जोस बटलरकरवी झेलबाद होऊन माघारी परतला. राहुल टेवाटियानं CSKला धक्का देताना रायुडूला ( १३) बाद करून RRला मोठे यश मिळवून दिले. चेन्नईचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या ५६ धावांत तंबूत परतले होते.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी चेन्नई सुपर किंग्सचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्या दोघांना धावा घेताना चाचपडावे लागले. RRच्या गोलंदाजांनी CSKच्या दोन दिग्गजांना मोठे फटकेच खेळू दिले नाही. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली असली तरी त्यांचा धावांचा वेग हा संथ ठेवण्यात RRच्या गोलंदाजांना यश आले. १८व्या षटकात २८ धावांवर धोनी धावबाद झाला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १२५ धावा करता आल्या. जडेजा ३५ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात राजस्थानची सुरुवातही निराशाजनक झाली. बेन स्टोक्स (१९), रॉबीन उथप्पा ( ४) आणि संजू सॅमसन ( ०) यांना लगेच माघारी जावे लागले. महेंद्रसिंग धोनीनं पाचव्या षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर घेतलेला झेल पाहून सारेच थक्क झाले.