Join us  

CSK Vs RR: १ चेंडू ५ धावा, स्ट्राइकवर MS धोनी; अखेरच्या क्षणी संदीप शर्माचा तो निर्णय अन् राजस्थानचा विजय

CSK Vs RR: चेन्नईला सामना जिंकण्यासाठी एका चेंडूत ५ धावांची आवश्यकता होती. तसेच स्टाइकवर धोनी होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:38 AM

Open in App

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान ३ धावांनी नमवले. राजस्थानने ६ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वल स्थानी कब्जा केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर राजस्थानने २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या. त्यानंतर त्यांनी चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७२ धावांमध्ये रोखले. चेन्नईचा लोकल बॉय रविचंद्रन अश्विनचा अष्टपैलू खेळ सीएसकेला भारी पडला.

शेवटच्या दोन षटकांमध्ये ४० धावांची गरज असताना महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. दोघांनी सातव्या गड्यासाठी ३० चेंडूंत नाबाद ४९ धावांची वादळी भागीदारी केली. परंतु अखेरच्या षटकात २१ धावांची गरज असताना दोघांना १७ धावाच काढता आल्या. विशेष म्हणजे या निर्णायक षटकात वेगवान गोलंदाज संदीप शर्माने पहिले दोन चेंडू वाईड टाकले, परंतु त्यानंतरही संदीपने राजस्थानने विजय खेचून आणला. 

चेन्नईला सामना जिंकण्यासाठी एका चेंडूत ५ धावांची आवश्यकता होती. तसेच स्टाइकवर धोनी होता. यावेळी अचूक टप्प्यात संदीपने यॉर्कर टाकल्याने धोनीला केवळ एकच धाव घेता आली आणि राजस्थानने हा सामना ३ धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतर संदीपने शेवटच्या षटकावर भाष्य केलं. धोनीविरुद्ध नेमका काय प्लॅन होता, याबाबत त्याने सांगितलं आहे. मला शेवटच्या षटकात यॉर्कर टाकायचे होते. मी नेटमध्ये चांगले यॉर्कर टाकत होतो. लेग-साइड देखील मोठी होती, पण योग्य ठिकाणी चेंडू टाकण्यात मी अपयशी झालो. त्यामुळे दोन चेंडू फुलटॉस गेले आणि धोनीने त्यावर दोन षटकार लगावले. त्यानंतर मी गोलंदाजीचा अँगल बदलला आणि अराउंड द विकेट टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय यशस्वी झाल्याचं संदीप शर्माने सांगितले. 

चेन्नईकडून डीवोन कॉन्वे आणि अजिंक्य रहाणे यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी केली. मधली फळी अपयशी ठरल्याचा चेन्नईला फटका बसला, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांनी मोक्याच्यावेळी प्रत्येकी २ बळी घेतले. राजस्थानने आव्हानात्मक मजल मारली. सलामीवीर जोस बटलरने अर्धशतक झळकावल्यानंतरही राजस्थानला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 

रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे आणि आकाश सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत चेन्नईला वर्चस्व मिळवून दिले. बटलर-देवदत्त यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४१ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने नवव्या षटकात देवदत्त पडिक्कल व कर्णधार संजू सॅमसनलाही बाद केले. यानंतर बटलर, अश्विन, शिमरोन हेटमायर यांनी फटकेबाजी केली. अश्विन व हेटमायर यांची फटकेबाजी राजस्थान संघासाठी निर्णायक ठरली.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्सआयपीएल २०२३
Open in App