इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला अवघे ७ दिवस शिल्लक आहेत.. २२ मार्चला चेपॉकवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्धाटनीय सामना खेळवला जाणार आहे. भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. गेल्या वर्षी आयपीएल जेतेपद जिंकल्यानंतर धोनी प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.
गतवर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाचवे आयपीएल जेतेपद पटकावले होते. यावेळी MS Dhoni सहाव्यांदा यलो ब्रिगेडला चॅम्पियन बनवून इतिहास रचण्याचा प्रयत्न करणार आहे. पण, आयपीएल २०२४ हा त्याचा शेवटचा हंगाम ठरू शकतो, अशी चर्चा झाली आहे. धोनीच्या क्रिकेट कारकीर्दिवर माजी सहकारी रॉबिन उथप्पा याने मोठे विधान केले आहे. आयपीएल २०२३नंतर झारखंडच्या धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आयपीएल २०२३ मध्ये खेळताना तो लंगडताना दिसला होता. पण, त्याने वर्षभरात चांगली मेहनत घेतली आहे आणि आता त्याचा फिटनेस पाहून सारे थक्क झाले आहेत.
जिओ सिनेमाशी बोलताना उथप्पा म्हणाला, उद्या जर महेंद्रसिंग धोनी व्हिलचेअरवर बसून खेळायचं म्हणाला, तर चेन्नई सुपर किंग्स त्याला खेळण्याची परवानगी देतील. मला वाटत नाही की फलंदाजी त्याच्यासाठी कधीच समस्या असेल. माझ्या मते ते विकेटकीपिंग आहे. गुडघे जीर्ण झाले आहेत आणि त्याला 'कीपिंग' आवडते. त्यामुळे तो तिथे उभा राहू शकणार नाही (जर तो विकेट्स राखू शकत नसेल तर). तो कदाचित इतर कोणत्याही कारणास्तव निवृत्त होऊ शकेल,” तो पुढे म्हणाला.
MS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण?सीईओ विश्वनाथन यांनी याचे स्पष्टपणे संकेत दिले आहेत. धोनी आणि मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग पुढील कर्णधार आणि उपकर्णधार निवडणार आहेत, असे स्पष्ट निर्देश संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनी दिल्याचे विश्वनाथन यांनी म्हटले आहे. यानुसार धोनीच आपला उत्तराधिकारी कोण असेल ते निवडणार आहे. निकटवर्तीयांनी धोनी आणखी दोन आयपीएल तरी खेळेल एवढा फिट असल्याचे म्हटले होते. परंतु सीएसकेची तयारी पाहता धोनीची ही कर्णधार म्हणून अखेरची आयपीएल असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे.