नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्समधील सध्याचे अनेक खेळाडू कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. पुढच्या वर्षी आयपीएलचा लिलाव होणार असल्याने काही युवा चेहऱ्यांना संघात स्थान देण्याचा संघाचा विचार दिसतो. आयपीएलसारख्या स्पर्धात्मक लीगमध्ये विजय नोंदविण्यासाठी योजनाबद्ध कामगिरीची गरज असते. तीन वेळचा चॅम्पियन सीएसकेचे नेतृत्व २००८पासून महेंद्रसिंग धोनी हाच करीत आहे. १३व्या पर्वात संघाला सेटबॅक आल्यापासून युवा खेळाडूंची गरज भासू लागली. सीएसकेने ज्या युवा चेहऱ्यांचा विचार सुरू केला, त्यात कर्नाटकचा सलामीचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल आघाडीवर आहे.
स्थानिक सामन्यात त्याच्या कामगिरीचा आलेख मोठा आहे. २०१९ पासून तो आरसीबीकडून खेळतो. मागच्या सत्रात त्याने १६ सामन्यात ४७३ धावा केल्या. भक्कम सलामीसाठी पडिक्कल फार उपयुक्त ठरू शकेल. सध्या मुंबई इंडियन्समध्ये असलेला झारखंडचा फलंदाज इशान किशन याच्याबाबतही विचार होत आहे. यंदा त्याने पंजाब किंग्सकडून खेळत असलेला डावखुरा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीपसिंग हादेखील उपयुक्त चेहरा आहे. डेथ ओव्हरमध्ये त्याचा मारा निर्णायक ठरू शकेल. मुंबई इंडियन्सचा लेग ब्रेक गोलंदाज हरियाणाचा राहुल चाहर हादेखील हुकमी एक्का आहे. सामना खेचून आणण्यात त्याचा हातखंडा आहे. याशिवाय राजस्थानचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याच्यावर सीएसकेची नजर आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. सध्या तो पंजाब संघातून खेळत आहे.