Is Mumbai Indians Playoff hopes still alive? - इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात जे घडले नव्हते ते आज घडले... सलग सात सामन्यांत पराभव पत्करणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ ठरला. पाचवेळा जेतेपदाची माळ गळ्यात घालणाऱ्या मुंबई इंडियन्सची नौका आयपीएल २०२२च्या किनाऱ्यावरच अडकली आहे. चेन्नई सुपर किंग्सने थरारक विजय मिळवून MIचा पाय आणखी खोलात ढकलला आहे. त्यामुळे आता रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखालील Mumbai Indians प्ले ऑफच्या शर्यतीत मुसंडी मारेल का?; या प्रश्नाचे उत्तर सर्वांना हवे आहे.
मुंबई इंडियन्सने तिलक वर्माच्या नाबाद ५१ आणि सूर्यकुमार यादव( ३२) व हृतिक शोकीन ( २५) यांच्या धावांच्या जोरावर ७ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नई सुपर किंग्सच्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात रोहित शर्मा व इशान किशनला माघारी पाठवले आणि त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसची विकेट घेत मुंबईचे कंबरडे मोडले. ड्वेन ब्राव्होने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात चेन्नईची अवस्थाही वाईट झाली होती. रॉबिन उथप्पा ( ३०) व अंबाती रायुडू ( ४०) यांनी डाव सावरला, परंतु MIच्या डॅनिएल सॅम्सने ( ४-३०) तो पुन्हा कोसळवला. महेंद्रसिंग धोनीने मॅच फिनिशरची भूमिका चोख वटवताना १३ चेंडूंत नाबाद २८ धावा चोपल्या. ड्वेन प्रेटोरिसनेही २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. चेन्नईने हा सामना ३ विकेट्स राखून जिंकला. तरीही त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता ही 4.87% इतकी आहे.
मुंबई इंडियन्सची काय अवस्थामुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्याशी आणखी एकदा खेळणार आहे, तर गुजरात टायटन्स व सनरायझर्स हैदराबाद यांनाही भिडणार आहे. सध्या मुंबईचा संघ गुणतालिकेत -०.८९२ नेट रनरेटसह १०व्या क्रमांकावर आहे. त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित सातही सामने जिंकावे लागतील. पण, तरीही त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता ही 0.134% आहे. गुजरात व बंगळुरू प्रत्येकी १० गुणांसह अव्वल दोन क्रमांकावर आहेत. राजस्थान, लखनौ व हैदराबाद यांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत. दिल्ली, कोलकाता व पंजाबच्या खात्यात प्रत्येकी ६, तर चेन्नईचे ४ गुण आहेत.